A simple Shravan Shashthi Yatra on Jotiba mountain tomorrow
A simple Shravan Shashthi Yatra on Jotiba mountain tomorrow

जोतिबा डोंगरावर उद्या साध्या पद्धतीने श्रावण षष्ठी यात्रा; भाविकांना डोंगरावर न येण्याचे आवाहन 

जोतिबा डोंगर  -  श्री क्षेत्र जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील आदिमाया चोपडाई देवीची श्रावण षष्ठी यात्रा उद्या ( ता. २५ ) एकदम साध्या पद्धतीने व भाविकांवीना होत असून या यात्रेसाठी भाविकांनी डोंगरावर येऊ नये असे अवाहन प्रशासनाने केले आहे. 

यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे प्रशासनाने श्रावण षष्ठी यात्रा रद्द केली असून केवळ मंदिरामध्ये धार्मिक विधी व इतर पारंपारीक विधी होतील.

पन्हाळा शाहुवाडीचे  पोलीस उपअधीक्षक अनिल कदम, कोडोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे यांनी डोंगरावर भेट देऊन बंदोबस्ताचे नियोजन केले. सर्व डोंगर दोन दिवस पूर्णपणे बंद करण्यात येणार असून परिसरातील  डोंगरावर येणाऱ्या सर्व वाटा बंद करण्यात येणार आहेत. चैत्र यात्रेप्रमाणे या षष्ठी यात्रेतही भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.


उद्या  (ता .२५ ) चोपडाई देवीची वैशिष्टयेपूर्ण अशी महापूजा बांधण्यात येत येईल. देवीस फुले  लिंबू , बेल यांच्या माळा करून मुकूट अर्पण करण्यात येईल . मंदिरात रात्रभर देवीचा जागर सोहळा होईल . यावेळी अखंड  कैताळ ढोलवादन शंखध्वनी होईल . रविवारी (ता. २६ ) पहाटे मंदिर परिसरात धुपारती निघेल व षष्ठी यात्रेची सांगता होईल . 


जोतिबाच्या सर्व भाविकांनी  षष्ठीचा उपवास आपआपल्या घरी  शनिवारी ( ता.२५ ) धरावा आणि रविवारी सोडावा असे आवाहन पूजारी ग्रामस्थांनी केले आहे. 

दरम्यान, यंदा डोंगरावर कोरोनामुळे चैत्र यात्रा झाली नाही. त्यात आता श्रावण षष्ठी यात्रा ही रद्द झाल्याने मोठा आर्थिक फटका ग्रामस्थ, पूजारी, दुकानदार, व्यापारी तसेच किरकोळ व्यावसाईक यांना बसला आहे.


 श्रावण षष्ठी यात्रे बद्दलची दंथकथा

श्री जोतिबा देवाच्या चरित्रात षष्ठी या तिथीला खूप महत्त्व आहे. पहिली चैत्र शुद्ध षष्ठी ज्या दिवशी केदारलिंगाचा अवतार झाला तर दुसरी श्रावण शुद्ध षष्ठी ज्या दिवशी देवी चोपडाईने रत्नासुराचा वध केला.

श्रीनाथ केदार म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आणि जमदग्नीचा रवांश यांच्या एकत्रित तेजातून प्रगटलेला दिव्य अवतार. संहारासाठी हिमालयातून देव सैन्य घेऊन नाथ महालक्ष्मीसह करवीराकडे निघाले. वाटेत सर्व तीर्थ क्षेत्रांची पुनः स्थापना करत आपल्या सैन्यासह महालक्ष्मी आणि श्रीनाथ चर्मण्वती म्हणजे चंबळ नदीच्या उगमाजवळ आले (हे स्थान मध्य प्रदेशातील इंदूरजवळ जानापाव डोंगरावर आहे ते परशूराम जन्म भूमी म्हणून ओळखले जाते.) शक्तीशाली असे देव सैन्याने पाहीले की एक म्हातारी मोठी परडी घेऊन बसली आहे. गर्वमदाने सैन्यातील गणांनी म्हातारीला हाकलून देण्याचा प्रयत्न केला पण ती हटेना. त्यावेळी तीने विनंती केली की माझी ही परडी उचलू लागा. देवांनी प्रयत्न करूनही ती हलेना. ही बातमी नाथ आणि महालक्ष्मीपर्यंत पोहोचताच दोघे हसले आणि नाथ म्हणाले अरे ती बहुता कालाची म्हातारी! साक्षात आदिशक्ती चला तिला शरण जाऊ. नाथ व महालक्ष्मी येताच वृद्धेनं आपलं मूळ रूप प्रकट केले. अष्टभुजा रुपात प्रकट झालेल्या त्या जगदंबेचा नाथांनी परिचय दिला. ही आदिशक्ती चर्पटा शक्ती माझ्या शक्तीचे मूर्तीमंत रुप. नाथांच्या क्रमणपद रुपाची मूर्तीमंत शक्ती अशी ही चरपदी म्हणजे चालती बोलती शक्ती अशी ही चर्पटांबिका अर्थात चोपडाई. चर्व्हासुराचा नाश करत ती हरिद्वार म्हणजे मायापुरी पर्यंत पोहोचली होती. चर्व्हासूर मर्दिनी म्हणून ती चर्पटांबा.

पुढे असूरांशी युद्ध करताना देव ज्योतिबानं रक्तभोज असूर मारला तेव्हा रत्नासूर युद्धाला आला. नाथांनी सात दिवस युद्ध केले शेवटी रत्नासूराचा वध शक्तीच्या हातून आहे हे जाणून तिला साद घातली. जगदंबा चोपडाई आली आणि श्रावण शुद्ध षष्ठीच्या दिवशी रत्नासूर महिषासुराचे रुप घेऊन धावून आला. तेव्हा देवीने अष्टभुजेच्या रुपात विक्राळ रुपात असूराचा वध केला. असूराचा वध झाला पण देवी शांत होईना. तिच्याच तेजाने इतर जग व्याकूळ होऊ लागलं. इतक्यात रक्तभोज दैत्याची पत्नी जलसेना सुवर्णपात्रात  जल रुप झाली. तीचे जळ घेऊन रत्नासुर पत्नी चंद्रसेना सुवर्ण पिंपळाचे  ३६० द्रोण भरुन घेऊन आली आणि अष्टगंध रुपी रक्तभोजाला त्या जळात मिसळून जणू तीने दोघा पत्नीचे ऐक्य केले. त्याबरोबरच रत्नासूराच्या किरीटाची ३६० रत्ने, ३६० दुर्वादल शमीपत्र त्या जलसेनेच्या द्रोणात घालून चोपडाई समोर आली. देवीला पाहून चंद्रसेना आपण अष्टभाव युक्त झाली तोच तीचे प्राण चोपडाई चरणी विलीन झाले आणि तिच्या शरीराला ३६० पदरी पवित्रक अर्थात पोवत्याचा आकार आला. तेव्हा देवांनी चोपडाईला शांत करण्यासाठी लिंबू वाळा  शमी अशा वस्तूंसह जलसेनेच्या अर्थात देववापीच्या तीर्थाने तीनशे साठ द्रोणांनी अभिषेक केला. जगदंबा शांत झाली आणि याच तीर्थात पोवतेरुपी चंद्रसेनेला स्नान घालून चोपडाईच्या गळ्यात स्थान दिले. यावर चर्पटांबेने भक्तांना आश्वस्त केलं  कृपा प्रसाद देऊन अभय दिलं. 

तीच प्रथा आजही श्रावण षष्ठी उत्सवाच्या निमित्ताने पाळली जाते. 
 या दिवशी भाविकांनी उपवास करावा.  या दिवशी तिन्ही सांजेला चोपडाईच्या मंडपात ढोल मांडून स्तुती केली जाईल. गाभाऱ्यात अभिषेक घालून देवीची लिंबू वाळा शमी या. वस्तूंनी पूजा बांधण्यात येईल. आरती होईल हा सोहळा रात्रभर चालेल. सकाळी सूर्योदयाला आरतीची मंदिर प्रदक्षिणा होऊन षष्ठीची सांगता होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com