सावधान : फसवणुकीचा नवा फंडा;एक लाख रुपयांना महिन्याला सहा हजार व्याज

सकाळ वृत्तसेवा | Sunday, 8 November 2020

महिन्याला लाखावर सहा हजार व्याज  वाहनांसाठीही कर्ज, त्यावर आकर्षक बक्षिसे

कोल्हापूर : एक लाख रुपयांना महिन्याला सहा हजार व्याज, ४० महिन्यांत रक्कम तिप्पट, वाहनांसाठी कर्ज, त्यावर आकर्षक बक्षिसे अशा जाहिरातीच्या माध्यमातून कोल्हापुरात आलेल्या काही कंपन्यांकडून पैसे उकळले जात आहेत. यातून मोठी आर्थिक फसवणूक होण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रीय आणि चांगली आर्थिक स्थिती असलेल्या बॅंकांना वर्षाला जे जमत नाही, ते या कंपन्या महिन्याला कसे व्याज देणार, याविषयी शंका उपस्थित केली जात आहे. 

शहर आणि परिसरात बाहेरगावाहून आलेल्या चार-पाच कंपन्यांनी आपली प्रशस्त कार्यालये थाटली आहेत. ट्रेडिंगच्या नावाखाली या कंपन्यांनी विविध आमिषे दाखवून गुंतवणूक करून घेतली. यात एक लाख रुपये भरल्यास त्यावर महिन्याला सहा हजार रुपये व्याज देण्याचे या कंपन्यांनी जाहीर केले. भरलेली रक्कम ४० महिन्यांत तिप्पट करून देऊ, असेही आमिष दाखविले आहे. या आमिषाला भुलून अनेकांनी या कंपन्यांत कोट्यवधींची गुंतवणूक केली. यात काही शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलिस आणि व्यावसायिकांचाही समावेश आहे. 

हेही वाचा- कोल्हापूर महापालिकेत  16 पासून प्रशासकीय राजवट -

आजच्या घडीला चांगल्या नागरी बॅंका असो किंवा राष्ट्रीयीकृत बॅंकेतही ठेवीवर वर्षाला सहा टक्के व्याज परवडत नाही. त्यामुळे तीन वर्षांत रक्कम दुप्पट हे अशक्‍य आहे. याच पद्धतीने काही पतसंस्थांनी यापूर्वी कोट्यवधी रुपये गोळा केले; पण ते परत करता न आल्याने या पतसंस्था संपल्या. अशीच स्थिती या कंपन्यांबाबत होण्याची भीती व्यक्त होत आहे. यापूर्वी गुंतवणूक केलेल्यांना व्याजाची रक्कम मिळाली; पण भविष्यात ती मिळेल का नाही, याविषयी साशंकता आहे. 

याच कंपन्यांनी वाहनांसाठीही आकर्षक कर्ज योजना व त्यावर बक्षिसेही जाहीर केली आहेत. पाच लाखांपर्यंतची गाडी घ्यायची असल्यास संबंधित व्यक्तीने फक्त अडीच लाख भरायचे, उर्वरित रक्कम कंपनी देईल. दहा लाखांच्या गाडीसाठी ही रक्कम सहा लाख रुपये आहे. गाडीची उर्वरित किंमत कर्जाच्या स्वरूपात संबंधिताच्या नावावर टाकली जाईल. या योजनेत भाग घेणाऱ्यांसाठी दुचाकी, चारचाकी, परदेश वारी किंवा गोवा ते मुंबई क्रुझ प्रवासाचे बक्षीस दिले जाणार आहे. अर्थकारणातील जाणकारांच्या मतेही ही योजनाही अशक्‍य आहे, तथापि यातही कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक लोकांनी केली आहे. 

संपादन - अर्चना बनगे