देशाचीच सेवा: अब तुम्हारे हवाले वतन साथीयों...!

संभाजी गंडमाळे   | Sunday, 22 November 2020

निगवे खालसा गावात अडीचशेहून अधिक तरुण रोज गाळतात घाम  

कोल्हापूर : करवीर तालुक्‍यातील निगवे खालसा हे तसं सात ते आठ हजार लोकवस्तीचं गाव. राष्ट्रप्रेमाने भारलेला गावातील प्रत्येक तरुण जणू देशसेवेसाठीच जन्माला आलेला. सैन्यात दाखल होण्याचं स्वप्न उराशी घेऊन आजही गावच्या मैदानावर अडीचशेहून अधिक तरुण रोज घाम गाळतात. त्यांना मार्गदर्शनासाठी निवृत्त सोळा फौजींची टीम तत्पर आहे... मात्र, आज हा सारा गोतावळा गलबलून गेला आणि या साऱ्यांना शहीद जवान संग्राम पाटील यांनी जणू ‘अब तुम्हारे हवाले वतन साथीयों...’ असाच संदेश दिला.

संग्राम शेतकरी कुटुंबातले. आठवीनंतर मामाचे गाव गाठले. तेथे सैन्यभरतीपूर्व प्रशिक्षण घेतले. २००२ मध्ये सैन्यात भरती झाल्यानंतर त्यांनी कुस्तीतही उल्लेखनीय कामगिरी केली. गावातील बाजीराव पाटील आणि संग्राम ही जोडगोळी अतुट मैत्रीचं आदर्श उदाहरणच. दोनच दिवसांपूर्वी त्यांचं फोनवरून बोलणं झालं. काल रात्री ‘कसं काय चाललं आहे’ असा मेसेजही आला; पण बाजीराव यांची आजची पहाटच संग्राम यांच्या वीरमरणाच्या बातमीने उजाडली. बाजीराव पाटील सांगतात, ‘‘एक डिसेंबरला संग्राम येणार होता. गावातीलच विनायक पाटील या जवानाला युनिटमधून त्याच्या वीरमरणाचा पहिला फोन आला; पण सायंकाळपर्यंत आम्ही त्याच्या घरातील कुणालाही या दुःखद घटनेची माहिती दिली नाही.’’

हेही वाचा- वीज बिलांवर कोल्हापुरी झटका ; वीज कट करणाऱ्याला तेल लावलेल्या पायताणचा हिसका

देशाचीच सेवा...
नावेच्या गल्लीत संग्राम राहायला होते. निवृत्तीनंतर संग्राम यांना देशसेवाच करायची होती. त्यासाठी त्यांना पोलिस दलात दाखल व्हायचे होते. तत्पूर्वी घराचे बांधकामही पूर्ण करायचे होते; पण ही दोन्ही स्वप्नं अर्धवटच राहिली. 

ज्या मैदानावर संग्रामनं सराव केला त्याच मैदानावर आता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. सध्या या मैदानावर भव्य क्रिकेट स्पर्धा सुरू होती; पण ती थांबवण्यात आली आहे. सध्या गावातील नव्वदहून अधिक तरुण सैन्यदलात कार्यरत आहेत. 
- म्हादजी पाटील, आजी-माजी सैनिक संघटना

 

संपादन- अर्चना बनगे