दक्षिण आफ्रिकेतील मालावी जातीचा हापूस इचलकरंजी दाखल
२५ पेट्यांची आवक; अठराशे ते दोन हजारांपर्यंत दर
इचलकरंजी (कोल्हापूर) : हापूस आंब्याप्रमाणे चव व रंग असलेला दक्षिण आफ्रिकेतील हापूस आंबा आता इचलकरंजीत दाखल झाला आहे. मालावी जातीचा असणारा हा हापूस आंबा पुणे-मुंबईनंतर शहरातील विक्रेत्यांकडे दाखल होत आहे. बाजारात सव्वा डझनाच्या २५ पेट्यांची आवक झाली आहे. डिसेंबरअखेर या आंब्याचा हंगाम राहणार असून शहरात एका डझनास १८०० ते २००० रुपये दर आहे.
कोकणचा राजा असलेल्या हापूस आंब्याप्रमाणे दक्षिण आफ्रिकेतील मालावी जातीचा हापूस आंबा मुंबई, पुण्यानंतर आता इचलकरंजीत दाखल झाला आहे. गेल्या वर्षीदेखील या मालावी हापूस आंब्याची आवक झाली होती. यंदा लवकरच हा आंबा बाजारात आल्याने आणखी जादा दिवस मालावी हापूस आंब्याची चव चाखायला मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मार्केट यार्डात सुमारे तीनशे पेट्यांची आवक झाली आहे. सध्या हंगामपूर्व मालावी हापूस आंबा बाजारात आल्याने त्याचे दर अधिक आहेत. आंब्याची आवक वाढेल तसे दरसुद्धा खालावतील. हा हंगाम डिसेंबरअखेरपर्यंत सुरू राहील, अशी माहिती फळ विक्रेते मुसंवीर बागवान यांनी दिली.
हेही वाचा- कोल्हापुरात १७ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह
दक्षिण आफ्रिका खंडातील मालावी देशात ‘मालावी मॅंगोज’ नावाची कंपनी स्थापन करण्यात आली आहे. दापोली कृषी विद्यापीठातून आंब्याची कलमे तिकडे नेऊन त्याचे रोपण करण्यात आले. या कलमांची अतिघन पद्धतीने लागवड करण्यात आली. दोन वर्षांपासून आंब्याचे उत्पादन सुरू झाले आहे. त्यानंतर या हापूस आंब्याची अन्य देशांत निर्यात सुरू झाली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून इचलकरंजी फळ बाजारात मालावी हापूस आंब्याची आयात होत आहे. हंगाम नसतानादेखील बाजारात हा मालावी हापूस आंबा ग्राहकांना भुरळ घालताना दिसत आहे. ग्राहकांकडून चांगली मागणी असून आंब्याला चांगले दर मिळत आहेत. रत्नागिरी व कर्नाटकातील हापूस आंब्याचा हंगाम सुरू होण्यास बराच कालावधी आहे.
संपादन- अर्चना बनगे