फ्लॅशबॅक ; १९८१-८२ ला कोल्हापूर महापालिकेचा कबड्डी संघ देशात भारी

special article of sambhaji gandmale on flashback kolhapur memories
special article of sambhaji gandmale on flashback kolhapur memories

कोल्हापूर : महापालिकेचा एकूणच इतिहास पाहता सर्वच खेळांना प्रोत्साहन देण्याचा विचार पहिल्यापासून येथे रुजला आणि त्या त्या खेळातील खेळाडूंना महापालिकेच्या माध्यमातून विविध ठिकाणी संधीही दिली गेली. कुस्ती, फुटबॉलबरोबरच कबड्डीही इथल्या मातीत तितक्‍याच जोमाने बहरली आणि इथले खेळाडू अगदी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन त्यांनी कोल्हापूरचा झेंडा अभिमानाने मिरवला. १९८१-८२ च्या सुमारास कोल्हापूर महापालिकेचा कबड्डी संघ संपूर्ण देशात भारी ठरला होता. अखिल भारतीय पातळीवरील महापालिका संघांच्या स्पर्धेचे विजेतेपद या संघाने कोल्हापूरला खेचून आले होते. 

कबड्डीचा एकूणच विचार केला तर हा क्रीडा प्रकार तसा जिल्ह्यातील विविध गावांबरोबरच शहरातही सुरवातीपासून रुजला. पुरुष असो किंवा महिला संघांचा दबदबा अनेक वर्षे कायम राहिला. चांगल्या कबड्डी खेळाडूंना विविध शिक्षण संस्था, ‘एमआयडीसी’तील औद्योगिक आस्थापनांबरोबरच कोल्हापूर महापालिकेनेही संधी दिली. तत्कालीन आयुक्त अरविंद सुर्वे यांच्याबरोबरच तत्कालीन महापौर धोंडिराम रेडेकर, क्रीडा सभापती उमेश चोरगे, स्थायी समिती सभापती संभाजी बसुगडे यांनी काही खेळाडूंना रोजंदारीवर नोकऱ्याही दिल्या. 

सुरवातीला महापालिकेच्या संघातून महापालिका शाळेतील क्रीडा शिक्षकांना अधिक प्राधान्य दिले जायचे; पण आयुक्त सुर्वे यांच्या काळात या संघात जिल्ह्यातील गुणी खेळाडूंना हेरून स्थान दिले गेले. बंगळूर येथे झालेल्या अखिल भारतीय महापालिका संघाच्या स्पर्धेत हा संघ दाखल झाला आणि देशभरातील नामांकित संघांना धूळ चारत विजेतेपदावर कोल्हापूरचे नाव कोरले गेले. कारण हा संघच तितक्‍याच ताकदीचा होता. पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथील नवभारत संघाचे खेळाडू विष्णू गावडे, बाळू पुजारी, डॉ. रमेश भेंडिगिरी, वडणगे (ता. करवीर) येथील जयकिसान संघाचे शिवाजी देवणे, सुरेश पोवार, कावळा नाका परिसरातील सुभाष साळोखे, चंद्रकांत साळोखे, शाबू दुधाणे, बाळू कुचिकोरवी, रमेश कुचिकोरवी आदींचा या संघात समावेश होता. 

अखिल भारतीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या संघातील दोन खेळाडूंचा जरी प्रातिनिधिक विचार केला तरी हा संघ कसा असेल, याची कल्पना हमखास येते. डॉ. रमेश भेंडिगिरी हे नाव पुढे कबड्डीच्या क्षेत्रात जगाच्या नकाशावर झळकले. आजही कबड्डीसाठीच त्यांनी आपल्या आयुष्यातील सारी पुंजी खर्ची घालून अत्याधुनिक ॲकॅडमीची स्थापना केली आहे. शिवाजी देवणे पुढे क्रीडा शिक्षक म्हणून गावातीलच देवी पार्वती हायस्कूलमध्ये रुजू झाले आणि मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले.

अलीकडच्या काळात कबड्डीतील ‘हनुमान उडी’ प्रसिद्ध झाली; पण नव्वदच्या दशकात ते शाळेतील विद्यार्थ्यांना ‘जयकिसान’च्या मैदानावर हे टेक्‍निक शिकवायचे. नव्वदच्या दशकात दूरदर्शनवर आंतरराष्ट्रीय कबड्डीचे सामने दाखवले जात. विशेषतः भारत आणि पाकिस्तान संघातील कबड्डी सामने अधिक चुरशीने व्हायचे. या चुरशीच्या सामन्यांत खेळाडूंनी वापरलेली विविध टेक्‍निकही ते आपल्या विद्यार्थ्यांवरही तितक्‍याच तळमळीने बिंबवायचे. 
महापालिका संघाकडून चाळीस वर्षांपूर्वी खेळलेल्या स्पर्धेत अर्थातच बंगळूरमधील सेमी फायनल आणि फायनल सामन्यात मुंबई आणि हैदराबादच्या संघांवर कशी मात केली, याच्या आठवणी ही मंडळी आजही तितक्‍याच सळसळत्या उत्साहात सांगतात.

"आयुक्त अरविंद सुर्वे यांच्या काळात आम्ही विशेषतः खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यावेळी एसटी महामंडळाचे संघही असायचे आणि जिल्ह्यातील गुणी खेळाडूंचा समावेश असणारा संघ ‘एसटी’च्या अधिकाऱ्यांनी तयार केला होता. महापालिकेचेही फुटबॉल आणि कबड्डी संघ होते आणि या संघांचा चांगलाच दबदबा निर्माण झाला होता."

- उमेश चोरगे, माजी क्रीडा सभापती

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com