पोलिसांच्या जेवणासाठी खास कोल्हापुरी यंत्रणा

संदीप खांडेकर
Wednesday, 15 April 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुकारलेल्या संचारबंदीत बंदोबस्तात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना "देवाक काळजी'चा प्रत्यय येत आहे. डोळ्यांत तेल घालून रस्त्यावर काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना वेळेवर जेवण मिळावे, यासाठी खास कोल्हापुरी यंत्रणा कार्यरत आहे. 

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुकारलेल्या संचारबंदीत बंदोबस्तात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना "देवाक काळजी'चा प्रत्यय येत आहे. डोळ्यांत तेल घालून रस्त्यावर काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना वेळेवर जेवण मिळावे, यासाठी खास कोल्हापुरी यंत्रणा कार्यरत आहे. त्यांच्याकडून जेवणाची पाकिटे पुरविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे ही यंत्रणा पदरमोड करून पोलिसांच्या मदतीला धावली आहे. क्‍लीन फूड ट्रीटचे राजू लिंग्रस, उमेश निगडे, विजय अगरवाल व जयेश कदम यांच्या संकल्पनेतला हा उपक्रम चर्चेचा ठरला आहे. 

शहरातील रस्त्यांवर पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच नागरिकांच्या आरोग्याची काळजी ते घेत आहेत. नागरिकांनी घराबाहेर न पडता कोरोनावर मात करावी, असा पोलिसांचा प्रयत्न आहे. तरीही शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांना पोलिसी खाक्‍या दाखविण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. तहान-भूक विसरून त्यांची कामगिरी नजरेत भरण्यासारखी आहे. त्यांना वेळेत जेवण मिळावे, यासाठी क्‍लीन फूड ट्रीटने वेळीच पावले उचलली. 
देशभरात 24 मार्चला संचारबंदी लागू झाली. त्या दिवसापासून पोलिसांना अन्न पुरवठा करण्यात येत आहे. राजारामपुरी, शाहूपुरी व वाहतूक शाखेच्या 200 पोलिस कर्मचाऱ्यांना, तर 60 आरोग्य व सफाई कामगारांना त्यांच्यातर्फे सुरवातीला दुपारी जेवणाची पाकिटे पुरविण्यात येत होती. आठवडाभरापासून रात्रीच्या जेवणाची सोयही केली जात आहे. क्वारंटाईन रुग्ण, लमाण तांडा, बिहारी लोकांनाही जेवण दिले जात आहे. चपाती, भाजी, मसाले भात, आमटी पॅकिंग करण्यासाठी चार जण कार्यरत आहेत. प्रतिभानगरातील महालक्ष्मी लॉनमध्ये जेवण बनविले जात असून, पाच महिला चपाती बनविण्यासाठी आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांसाठी 300 किलो चक्की व भडंग तयार करून पुरविण्यात आले आहे. 

30 एप्रिलपर्यंत सेवा 
उज्ज्वल नागेशकर, सुशांत पै, शैलेश पेडणेकर यांचे उपक्रमासाठी सहकार्य मिळत आहे. 22 मार्चला पुकारलेल्या "जनता कर्फ्यू'मध्ये इचलकरंजीत एक हजार पोलिस कर्मचाऱ्यांना जेवण दिले. त्यासाठी दगडूलाल मर्दा चॅरिटेबल ट्रस्टचे सहकार्य मिळाले. त्याचदिवशी कागल, इस्पुर्ली, मुरगूडमधील पोलिस कर्मचाऱ्यांना जेवणाची सोय केली होती. तोच उपक्रम पुढे सुरू ठेवला आहे. 30 एप्रिलपर्यंत तो सुरू राहील. 
- राजू लिंग्रस 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special Kolhapuri System For Police Meals Kolhapur Marathi News