मी नवदुर्गा : बेवारस आणि गरीब रुग्णांवर स्मशानभूमीत जाऊन अंत्यसंस्कार करणाऱ्या बेळगावच्या रणरागिणीची कहाणी

मिलींद देसाई
Saturday, 17 October 2020

स्वत: रुग्णवाहिका चालवत रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत, याकडे लक्ष देत आहेत.

बेळगाव : पुरातन काळापासून अंत्यसंस्काराचा विधी पुरुष मंडळीच करत आली आहेत. आजही अनेक महिला स्मशानभूमीत जाण्यास घाबरतात; मात्र शहरातील एक महिला बेवारस व गरीब रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेत आहे. आतापर्यंत ४५ हून अधिक जणांवर तिने अंत्यसंस्कार केले आहेत.

माधुरी जाधव-पाटील असे या महिलेचे नाव आहे. त्या चावडी गल्ली, वडगावातील रहिवासी असून आनंदनगर हे त्यांचे माहेर आहे. या कार्यासाठी त्यांना त्यांच्या कुटुंबाचीही मदत होत आहे.
कोरोनाचे संकट निर्माण झाल्यापासून शहर आणि परिसरात कोरोना रुग्णांसह इतर आजारांनी त्रस्त असणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कोरोनाच्या संकटकाळात अनेकजण आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा - सनई, तुतारी, ढोल, ताशाच्या निनादात दख्खनचा राजा श्री . जोतिबा डोंगरावर नवरात्र उत्सवास प्रारंभ -

कोरोनामुळे अनेकांच्या कुटुंबातील सदस्यही अंत्यसंस्काराकडे पाठ फिरवत आहेत. अशा परिस्थितीत शहरातील माधुरी जाधव-पाटील या रुग्णांना रुग्णालयात वेळेत दाखल करण्यासाठी धडपडण्याबरोबरच एकदा रुग्ण दगावल्यास तसेच गरज पडल्यास त्यांच्यावर अंत्यंस्कार करण्यासाठी धाव घेत आहेत. तसेच स्वत: रुग्णवाहिका चालवत रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत, याकडे लक्ष देत आहेत.

कोरोनाचे संकट निर्माण झाल्यापासून शहर आणि परिसरात कोरोना रुग्णांसह इतर आजारांनी त्रस्त असणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अनेकांना यामध्ये आपला प्राणही गमवावा लागत आहे. अशावेळी एखाद्या गरीब व्यक्‍तीकडे अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नसतील, तर हेल्प फॉर निडी संस्थेच्या माध्यमातून अंत्यसंस्कारही केले जात आहेत. कोरोना संकटकाळात रुग्णांना रुग्णालयात पोचविण्यासाठी रुग्णवाहिकांनाही मोठी मागणी वाढली आहे; मात्र अनेकदा रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. याची दखल घेऊन माधुरी जाधव-पाटील यांनी रुग्णवाहिका चालविण्यास सुरुवात केली.

हेही वाचा -  यंदा आंब्याचा हंगाम लांबणार ? -

गेल्या अनेक वर्षांपासून गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेणाऱ्या हेल्प फॉर निडी संस्थेचे सुरेंद्र अनगोळकर यांच्या मार्गदर्शनानुसार श्रीमती जाधव-पाटील यांनी सामाजिक कार्यात भाग घेण्यास सुरुवात केली. कोरोनामुळे नातेवाईकही रुग्णांजवळ जाण्यास घाबरत असताना त्या या मोठ्या धाडसाने अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यामुळेच त्यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. 

"बेवारस लोकांबरोबरच अनेकदा काही जणांना अंत्यसंस्कार करण्यासाठीही अडचणी येतात. अशावेळी त्यांच्या मदतीला धावून जाण्याचे काम हेल्प फॉर निडीच्या माध्यमातून सुरू आहे. या संस्थेशी जोडल्यांनतरच समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळाली."

- माधुरी जाधव-पाटील

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special story for navaratri special navdurga mrs. madhavi jadhav on her working for corona patients in belgaum