जनावरांची विशिष्ट ओळख क्रमांक योजना ठप्प

Specific Identification Number Of Animals Scheme stopped Kolhapur Marathi News
Specific Identification Number Of Animals Scheme stopped Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : जनावरांची उत्पादकता वाढावी आणि आरोग्य सुधारावे, या उद्देशाने जनावरांना विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात आले. मात्र, दोन वर्षांचा कालावधी उलटला तरी जनावरांची ऑनलाइन माहिती भरण्यात पशुसंवर्धन विभाग "ऑफ'च असल्याचे समोर येत आहे. पशुधन विकास अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यात शासनाने माहिती भरण्यासाठी आऊटसोर्सिंग करण्याला नकार दिला आहे. परिणामी, जनावरांची उत्पादकता वाढविणे आणि आरोग्य सुधारण्याचे नियोजन कागदावरच राहिले आहे. त्यामुळे योजना तशी चांगली पण, रिक्त पदात अडकली असे म्हटल्यास वावगे ठरू नये. 

शेतीपूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाकडे पाहिले जाते. अलीकडे मुख्य व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यातून दुग्ध व्यवसाय वाढला असला तरी प्राण्यांची उत्पादकता म्हणावी तितकी नसल्याचे समोर आले. त्याचबरोबर जनावरांचे आरोग्य सुधारणे आणि त्यांच्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे या बाबीही महत्वपूर्ण होत्या. यामुळे माहिती तंत्रज्ञान आणि आधुनिक साधनांचा वापर करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने प्राणी उत्पादकता आणि आरोग्यासाठी माहिती नेटवर्क (इनाफ) ही योजना आणली. इनाफ टॅगिंगद्वारे प्रत्येक जनावराला आधार क्रमांकाच्या धर्तीवर विशिष्ट ओळख क्रमांक देण्याचे नियोजन केले. 

पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा दूध संघाकडे (गोकूळ) इनाफ टॅगिंगचे काम सोपविले. जनावरांच्या कानामध्ये ओळख क्रमांकाचा टॅग मारल्यानंतर तो ऑनलाइन करायचा. तेथून पुढे जनावरावर केले जाणारे उपचार, त्याचा बदलणारा मालक, अन्य माहिती अपलोड करणे अपेक्षित आले. मात्र, मूळात पशुधन विकास अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहे. तालुक्‍यात 16 पदे मंजूर असताना सध्या केवळ पाच पशुधन विकास अधिकारी डोलारा सांभाळत आहेत. त्यात जनावरांवरील उपचारासारखे टेक्‍निकल काम केल्यानंतर माहिती भरण्याच्या क्‍लिरिकल कामाचाही आग्रह धरण्यात आला. सदरचे काम आऊटसोर्सिंगने करावे किंवा तालुक्‍याला किमान एक डाटा एन्ट्री ऑपरेटर द्यावा, या मागणीलाही शासनाने कचऱ्याची टोपली दाखविली आहे. परिणामी, पशुसंवर्धन विभागाच्या पातळीवर या योजनेचे काम ठप्पच असल्याचे दिसून येते. 

"गोकूळ' "ऑन'वर... 
जनावरांची माहिती भरण्यात शासनाचा पशुसंवर्धन विभाग "ऑफ' असला तरी जिल्हा दूध संघ (गोकूळ) "ऑन'वर आहे. गोकूळच्या डॉक्‍टरांकडून जनावरांवरील उपचाराला इनाफ टॅगिंग करुनच सुरवात केली जाते. कार्यालयात आल्यानंतर संबंधित जनावरावर केलेल्या उपचाराची माहिती ऑनलाइन केली जाते. सध्या केवळ आरोग्यविषयकच काम सुरू असले तरी 1 मार्चपासून अन्य माहितीही अपलोड केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. 

50 टक्केच टॅगिंग... 
जनावरांचे क्रमांक निश्‍चित करण्यासाठी सप्टेंबर 2017 मध्ये पशुसंवर्धन विभागाकडून गडहिंग्लज तालुक्‍याला 14 हजार टॅग उपलब्ध झाले. त्यानंतर फेब्रुवारी 2019 मध्ये पुन्हा दोन हजार टॅग आले. मात्र, पशुसंवर्धन विभागाकडून पाच हजार 802 म्हैस वर्ग जनावरांचे तर दोन हजार 249 गाय वर्ग जनावरांचे टॅगिंग झाले आहे. म्हणजे टॅगिंगद्वारे जनावरांचे विशिष्ट क्रमांक निश्‍चित करण्याचे कामही केवळ 50 टक्केच झाल्याचे दिसून येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com