स्टार्टअप ः मास्कमुळे मिळाली सुरक्षा अन्‌ रोजगारही....

आकाश खांडके | Saturday, 29 August 2020

कोल्हापूर ः कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मास्कला महत्त्व आले. सुरवातीला विशिष्ट रंगांत आकारात असलेले मास्क हल्ली रंगबिरंगी, बहुढंगी होत आहेत. त्याचबरोबर मास्क निर्मिती व विक्री व्यवसायात चलती आहे. यातून लाखोंची उलाढाल होऊन रोजगारही वाढला आहे. 

कोल्हापूर ः कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मास्कला महत्त्व आले. सुरवातीला विशिष्ट रंगांत आकारात असलेले मास्क हल्ली रंगबिरंगी, बहुढंगी होत आहेत. त्याचबरोबर मास्क निर्मिती व विक्री व्यवसायात चलती आहे. यातून लाखोंची उलाढाल होऊन रोजगारही वाढला आहे. 
मास्कची मागणी वाढू लागल्याने वस्त्रोद्योजकांबरोबर गृहिणीही या व्यवसायात उतरल्याने रोजगार विस्तारला. त्याचबरोबर जिल्ह्यात पाच हजारपेक्षा अधिक विक्रेत्यांना लाभ होत आहे. घरबसल्या महिला महिन्यास सहा ते सात हजार उत्पन्न मिळवू लागल्या आहेत. 
केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील म्हणाले की, मेडिकल स्टोअरमध्ये वैविध्यपूर्ण मास्क आहेत. यात "एन 95' मास्कला सर्वाधिक मागणी आहे. त्यासोबतच कापडी मास्कची विक्री जोमात आहे. पुन्हा वापरता येणारे व वापरून झाल्यावर नष्ट करता येणारे असे दोन प्रकारचे मास्क आहेत. वीस रुपयांपासून एकशे वीस रुपयांपर्यंत किमती आहेत. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात मागणी जास्त आहे. "एन 95' मास्क वैद्यकीय व्यवसायातील लोक जास्त वापरतात. ते दिल्ली, पुणे, मुंबईवरून मागवले जातात. 
मागणी वाढल्याने स्थानिक पातळीवर मास्क निर्मितीला गती आली. इचलकरंजी व आजूबाजूच्या भागातील दीडशेहून अधिक गारमेंट युनिटधारकांनी मास्क निर्मिती सुरू केली. दिवसाला दीड ते अडीच लाख मास्कची निर्मिती केली जाते. त्यामुळे पाच हजारपेक्षा जास्त महिलांना रोजगार मिळाला. एक महिला दर दिवसाला दीडशे ते दोनशे मास्क तयार करते. यामध्ये हिरव्या रंगाच्या मास्कला सर्वाधिक मागणी आहे. तसेच फिल्टरचे मास्कही बनवले जातात, अशी माहिती गारमेंट चालक राजू बोंद्रे यांनी दिली. 

मास्कमधून स्टार्टअप 
मेघा माने यांनी कोरोनाच्या संकटाचे संधीत रूपांतर केले आहे. पिशवी व गारमेंट्‌सचा घरगुती व्यवसाय ठप्प झाल्यावर त्यांनी मास्कची निर्मिती सुरू केली. त्यामुळे दहा महिलांना रोजगार मिळाला. दिवसाला दहा हजार मास्कची निर्मिती सुरू आहे. यामध्ये फिल्टर मास्क, ग्रीन मास्क, कार्टून मास्क यांचा समावेश आहे. 

कोट: 
""लॉकडाउनमुळे शिवणकाम थांबले. अशा महिलांना सोबत घेऊन मी उपक्रम सुरू केला. त्यामुळे एक महिला सहा हजारांचे उत्पन्न मिळवू लागली. त्यांना रोजगाराची संधी देता आली याचे समाधान आहे.'' 
मास्क निर्मितीधारक ः मेघा माने.

 

संपादन - यशवंत केसरकर