"किती आले किती गेले, मुंबईकरांचे प्रेम मात्र शिवसेनेवरच"
आई अंबाबाई, महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर परिवहन मंत्री अनिल परब ः भाजपा, फडणवीसांवर टीका
कोल्हापूर : आई अंबाबाई महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर, असे साकडे आज राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी घातले. मंदिरे आता भाविकांसाठी खुली झाली असल्याने आज सकाळी त्यांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, मुंबईने शिवसेनेची साथ कधीही सोडली नाही. कारण चांगल्या आणि वाईट काळात शिवसेना मुंबईकरांबरोबर राहिली असून प्रत्यक्ष निवडणुकीतही तसेच चित्र दिसेल, असेही त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच मुंबई महापालिकेवर भाजपाचा भगवा असेल, असा निर्धार व्यक्त करताना शिवसेनेवर टीका केली. या पार्श्वभूमीवर मंत्री श्री. परब यांनी भाजपा व फडणवीस यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, "" किती आले किती गेले, मुंबईकरांचे प्रेम मात्र शिवसेनेवरच राहिले आहे. विरोधकांना आता कुठलेच काम नसल्याने रोज एक आरोप ते करत रहातात. मात्र, महाविकासआघाडी सरकारमध्ये कुठलीही धुसपूस नाही. लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करावे, अशी सामान्य जनतेची मागणी आहे. येत्या काही दिवसात याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.''
हेही वाचा- निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज; मतदानकेंद्र निश्चिती, कर्मचारी नियुक्ती पूर्ण
दरम्यान, यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार यांनी मंत्री श्री. परब यांचे स्वागत केले.
संपादन- अर्चना बनगे