कोल्हापूर जिल्हात लॉकडाउनची कडक तयारी, विनाकारण फिरणाऱ्यांची गय नाही

 Strict preparation for lockdown in Kolhapur district
Strict preparation for lockdown in Kolhapur district

कोल्हापूर ः लॉकडाउन आदेशाचा भंग करून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून, शहरातील सहाशे पोलिस पहाटेपासून रस्त्यावर उतरणार आहेत. शहरातील 32 पॉईंटवर त्यांची करडी नजर राहणार आहे. बॅरिकेडस्‌ लावून मुख्य मार्ग सील करण्यात येणार आहेत. 
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आज (ता. 21) पासून पुन्हा एकदा लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे काटेकोर अमंलबाजवणीसाठी जिल्हा पोलिस दल सज्ज झाले आहे. जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या 14 मार्ग व प्रमुख 14 अशा 28 मार्गांवर कडक नाकाबंदी करण्यात आली आहे. पोलिसांनी शहरावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील 32 पॉईंटवर चोवीस तास नाकाबंदी करण्यात आली आहे. 
शहरातील चारही पोलिस ठाण्यांसह, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचा पोलिसांचा फौजफाटा पहाटेपासून, तर काही ठिकाणी मध्यरात्रीपासून रस्त्यावर तैनात राहणार आहे. प्रमुख रस्ते बॅरिकेडस्‌ लावून वाहतुकीस बंद करण्यात आले आहेत. गल्लीत क्रिकेट, फुटबॉल असे खेळ करणाऱ्यांसह, कट्टयावर गप्पा मारणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांसह वाहनचालकांची वाहने जागेवर जप्त केली जाणार आहेत. हुज्जत घालणाऱ्यांची छायाचित्रे काढून त्यावर नंतर कारवाई करण्याचे नियोजनही पोलिसांनी केले आहे. संपूर्ण शहरातील बंदोबस्तावर शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांचे लक्ष असणार आहे. 

शहरात इथे आहे बंदोबस्त 
शिरोली जकात नाका, लिशा हॉटेल चौक, ताराराणी चौक, दाभोळकर कॉर्नर, छत्रपती शिवाजी चौक, बिंदू चौक, रंकाळा टॉवर, वाशी नाका, इंदिरा सागर चौक, सायबर चौक, शाहू टोल नाका, मध्यवर्ती बस स्थानक, महाद्वाररोड, शिवाजी पूल, शाहू मिल चौक, बिनखांबी गणेश मंदिर, गंगावेस, पापाची तिकटी आदी 32 ठिकाणी पोलिसांचा चोवीस तास बंदोबस्त राहणार आहे. 

भ्रमात राहू नका... 
विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनचालकांची वाहने जप्त करण्यात येणार आहेत. लॉकडाउन उठल्यानंतर नाममात्र दंड भरून वाहने सोडली जातात अशा भ्रमात आता राहू नका. अशा वाहनांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेतही पोलिसांकडून देण्यात आले. 

मॉर्निंग, इव्हिनिंग वॉकर्सवर लक्ष 
लॉकडाउन काळात मॉर्निंग व इव्हिनिंग वॉकर्सवर पोलिसांची नजर राहणार आहे. रंकाळा, कळंबा तलाव, शिवाजी विद्यापीठ परिसर, रिंगरोड, तपोवन मैदान, हॉकी स्टेडियमसह उपनगरातील भागांत पोलिसांची गस्त राहणार आहे. 

कोल्शहापूर हरातील बंदोबस्त 
फिक्‍स पॉईंट ः 32 
कर्मचारी ः 600 
अधिकारी ः 24 
क्रेन ः 8 

विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे सर्वांनी पालन करावे. प्रेरणा कट्टे (शहर पोलिस उपअधीक्षक) 

संपादन - यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com