निवडणुकी वेळी ते होते स्टार प्रचारक ; आता फिरावं लागतंय वणवण

struggle of circus man vilas kamble in kolhapur
struggle of circus man vilas kamble in kolhapur

कोल्हापूर - माणसाचं आयुष्य हे एक चक्रच, कधी धावत तर कधी थांबत, कसबा बावडा येथे राहणारे विलास कांबळे. सायकलच्या दोन चाकांच्या कलेवरच यांचं तारुण्य अन्‌ सध्याच उतरतं वय ही गेले. विलास हे सायकल सर्कस कलाकार, गावोगाव फिरत सायकलीवर बसून कसरतीचे प्रयोग करायचे, प्रेक्षकांच्या टाळ्या घ्यायच्या, बक्षिसे मिळवायची आणि संसाराची चाके पुढे ढकलायची असा त्यांचा प्रवास पण कोरोनानंतर त्यांच्या या कलेची चाके रुतली आहेत. सर्कशीचे काम थांबल्याने काम शोधत फिरण्याची वेळ त्यांच्यावर आहे.

शाळेत असताना सायकलवर कसरती करणाऱ्या एका कलाकाराचा प्रयोग त्यांनी पहिला आणि या कलेचं त्यांना आकर्षण निर्माण झालं.पन्नास पैसे देऊन भाड्याने सायकल घेत ते शिकत राहिले. तब्बल चार वर्षांनी ते यात पारंगत झाले.1985 साली त्यांनी कुरुकली येथे पहिला प्रयोग सादर केला. लोकांनी कौतुक केलं. बक्षीस दिलं. तेव्हापासून त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. एसएससीपर्यंत शिकलेले विलास शिक्षक झाले असते, परंतु त्यांनी या सर्कस कलेला आयुष्य समर्पित केलं.

वय 65 वर्षे पण हातातली सायकल सुटली नाही...

कसरतीचे प्रयोग करण्यासाठी त्यांचं गावोगाव फिरणं सुरू झालं .पत्नी, लहान मुलगा तर कधी मावस भावाला सोबत घेत महाराष्ट्रच नव्हे तर गुजरात, कर्नाटक, तामिळनाडूपर्यंत जाऊन ते पोहचले. हिंदी सिनेमातील देशभक्तीपर गीते लाऊडस्पीकर वर लावायची. गावच्या चौकात गर्दी जमायची. एका चाकावर सायकल चालवणे, चालू सायकलवरून न उतरता जमिनीवरील उभी सुई डोळ्याच्या पापण्याने उचलणे, मुलगा खांद्यावर घेत हात सोडून सायकल चालवणे, उलट सुलट सायकल चालवणे असे प्रयोग करत ते प्रेक्षकांची मने जिंकत. एका प्रयोगातून एक ते दीड हजारापर्यंत त्यांना बक्षीस मिळायचं. लोक खुश होऊन धान्य ही द्यायची. संसाराचा गाडा धावत होता. या कलेच्या जीवावर जगणं सुरू होत.
मुलं शिकवली, मोठी केली. अलीकडे लोकांच्या मनोरंजनाची साधने बदलली. टेलिव्हिजन, मोबाईल आले. लोकांनी या सर्कशीच्या खेळाकडे पाठ फिरवली. तरी ही 65 वर्षीय विलास यांच्या हातातली सायकल सुटली नाही. त्यांनी हा छंद कायम ठेवला. नऊ महिन्यापूर्वीच त्यांच्या सर्कशीच्या प्रयोग कर्नाटकमध्ये झाला पण कोरोना महामारीत त्यांच्या धावत्या सायकलची चाके सध्या थांबली आहेत. हाताला काही तरी काम मिळावे यासाठी ते शहरात वणवण फिरत आहेत.

निवडणुकी वेळी ते होते स्टार प्रचारक...

विलास उत्कृष्ट सर्कस कलाकार म्हणून नावारूपाला आले. जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या प्रचारावेळी सायकलवरून फिरत त्यांनी प्रचार केला. नेत्याला निवडून आणण्यात त्यांनी वाटा उचलला.परंतु आपल्या कलेने कोल्हापूरच नाव महाराष्ट्रसह इतर राज्यात पोहचवणाऱ्या विलास यांना नेते मंडळी विसरले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com