अहवाल पॉझिटिव्ह आला तर? विद्यार्थ्यांत घालमेल

सतीश जाधव
Thursday, 19 November 2020

पालकही संमतीपत्र देण्याबाबत द्विधा मनस्थितीत; कॉलेजमधील हजेरीवर परिणाम

बेळगाव: सुमारे आठ महिन्यानंतर 17 नोव्हेंबरपासून महाविद्यालये सुरु झाली आहेत. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येण्यासाठी कोरोना चाचची तसेच पालकांचे संमतीपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. यामुळे कोरोना चाचणी करावी की नको? चाचणी केल्यानंतर आपण पॉझिटिव्ह आलो तर काय? अशा द्विधा मनस्थितीत विद्यार्थी अडकले आहेत. तर आपल्या पाल्याला महाविद्यालयात पाठवून देण्यास पालकांचीही घालमेल सुरु झाली आहे.

कोरोनामुळे 24 मार्चपासून देशात लॉकडाउन करण्यात आले. तेव्हापासून महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. त्यानंतर अंतिम वर्षाच्या परीक्षा वगळता इतर परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या. आता नवीन विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियाही झाली आहे. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्‍लासेसही सुरु झाले आहेत. सरकारने विविध नियम व अटी घालून महाविद्यालये सुरु करण्यास परवानगी दिली आहे. महाविद्यालयांमध्ये सध्या शिक्षकांची कोरोना चाचणी केली जात आहे. मात्र, विद्यार्थ्यांना बाहेरून चाचणी करुन घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

सध्या जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी मोफत करुन दिली जात आहे. मात्र, खासगी रुग्णालयात यावर आकारणी केली जात आहे. आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक असल्याने हीच चाचणी विद्यार्थी करुन घेत आहेत. सदरच्या चाचणीचा अहवाल दोन दिवसानंतर येतो. त्यामुळे आपला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला तर काय, अशा मनस्थितीत विद्यार्थी सापडले आहेत.

अजूनही अनेक विद्यार्थ्यांनी कोरोना चाचणी करुन घेतली नसल्याने महाविद्यालयात विद्यार्थ्यांची हजेरी तुरळक आहे. त्यामुळे प्राध्यापकांकडून अजूनही ऑनलाईन वर्ग घेतले जात आहेत. आणखी काही दिवस ऑनलाईन वर्गच घेतले जाणार आहेत. महाविद्यालयात जाण्यासाठी मुले आपल्या पालकांकडून संमतीपत्र घेत आहेत. मात्र, अजून काही दिवस थांबा, मग कॉलेजला जा अशी उत्तरे काही पालक देत आहेत. यामुळे विद्यार्थीही बुचकळ्यात पडले आहेत.

""आठ महिन्यांपासून बंद असलेली महाविद्यालये 17 नोव्हेंबरपासून सुरु झाली आहेत. कारोना चाचणी व पालकांचे संमतीपत्र सक्तीचे केले आहे. कोरोना चाचणी करताना भिती वाटत आहेत. तसेच पालकही महाविद्यालयात अजून थोड्या दिवसांनी जा असे सांगत आहेत.''
-महादेव खोत, विद्यार्थी

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: student confused going to college because covid 19 impact