'ऑनलाईन'च्या प्रश्‍नावर असे शोधले उत्तर...विद्यार्थ्यांना दिली स्वाध्याय पुस्तिका! 

Study From Swadhyay Booklet In Atyal Kolhapur Marathi News
Study From Swadhyay Booklet In Atyal Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळांना सुरवात झालेली नाही. त्याला पर्याय म्हणून ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केला. पण, अनेक पालकांकडे स्मार्टफोनचा अभाव आहे. शिवाय ऑनलाईन दिलेला अभ्यास तपासायचा कसा, हाही प्रश्‍न आहे. या प्रश्‍नावर अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथील प्राथमिक शाळेने स्वाध्याय पुस्तिकांचे (वर्क बुक) उत्तर शोधले आहे. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना त्याचे वितरण केले आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. पण, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केला आहे. ऑनलाईन अभ्यासात स्मार्टफोनची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र, अनेक पालकांकडे स्मार्टफोनचा अभाव आहे. अत्याळ येथील महात्मा फुले विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचे पालकही त्याला अपवाद नाहीत. 60 ते 70 टक्के पालकांकडे स्मार्टफोन नसल्याचे दिसून आले. तसेच ज्या पालकांकडे स्मार्टफोन आहेत, त्यांना कामाच्या व्यापातून मुलांकडे देणे शक्‍य होत नव्हते. 

या समस्येवर स्वाध्याय पुस्तिकांचा मार्ग काढला आहे. शाळेतील पहिली ते चौथीच्या 70 विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका देण्यात आल्या. माजी विद्यार्थी संघटनेने गतवर्षी ठेवलेल्या ठेवीचे व्याज साडेपाच हजार रुपये, माझी शाळा समृद्ध शाळा स्पर्धेतील पारितोषिकाचे पाच हजार रुपये, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश गोडसे, उपाध्यक्ष विनायक मोहिते, पालक पांडुरंग देवरकर यांच्याकडून प्रत्येकी दोन हजार रुपये असा 16 हजार 500 रुपयांचा निधी जमा झाला. यातून स्वाध्याय पुस्तिकांची खरेदी केली. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना त्याचे वाटप करण्यात आले आहे. 

आठवड्यातून तपासणी... 
शिक्षकांनी दररोज दिलेल्या अभ्यासानुसार या स्वाध्याय पुस्तिका विद्यार्थ्यांनी घरी सोडवायच्या आहेत. यामध्ये पालकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. दर शनिवारी विद्यार्थ्यांकडून स्वाध्याय पुस्तिका जमा करून शिक्षक त्यांची तपासणी करणार आहेत. यामुळे दिलेला अभ्यास पूर्ण केला आहे की नाही, यावरही लक्ष राहणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com