Success Story : दहा गुंठ्यांत पानमळा पिकवून झाला लखपती

राजेंद्र कोळी | Friday, 6 November 2020

तब्बल सात ते आठ फूट उंच तंबाखूची रोपे पिकवुन शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

चिक्कोडी : एकीकडे शेती करणे नुकसानकारक ठरत असल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. पण सुधारित पद्धतीने शेती करीत भीमा उदगट्टी या चिक्कोडी तालुक्यातील युवा शेतकऱ्याने शिरगाव येथे दहा गुंठ्यात पाच लाखाचा पाणमळ्यातून निव्वळ नफा मिळवला आहे. तसेच  तब्बल सात ते आठ फूट उंच तंबाखूची रोपे पिकवुन शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. ही पिके पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. कमी खर्चात अधिक लाभ मिळण्याचे शेती तंत्र त्यांनी अवगत केले आहे.  

शिरगाव हे चिक्कोडी तालुक्यातील डोंगराळ भागातील गाव असून अनेक पिढ्यांपासून येथे खाऊची पाने व तंबाखूचे पीक घेण्यात येते. अलीकडे पाण्याची उपलब्धता, हवामानातील बदल यामुळे शेतकरी अन्य पिकांकडे वळले आहेत. तरी गावातील अर्ध्याहून अधिक शेतकऱ्यांकडून पानमळे व तंबाखूचे पीक घेण्यात येते. 

हेही वाचा - यंदाची दिवाळी उसाच्या फडावरच -

आठ फूट उंचीचा तंबाखु

उदगट्टी यांचे ठिबक सिंचन साहित्य व मोटर पंप विक्रीची दुकाने असून कमी शेती असल्यामुळे मजुरांना लावून ते शेती करून घेतात. दहा गुंठे शेतात त्यांनी 428 जातीच्या 870 तंबाखूची रोपांची लागन केली. त्यासाठी एक ट्रक शेणखत सोडले  व 10 ऑगस्टला मल्चिंग पेपरवर सव्वातीन बाय साडेचार फुटाचे अंतर ठेवून रोपे लावली. लागण केल्यानंतर ठिबक सिंचनच्या माध्यमातून पाणी व इतर खते देण्याचे सुरू केले. साधारणत: ह्यासाठी दहा हजाराचा त्यांना करावा लागला आहे. उदगट्टी यांना पूर्वीपासून तंबाखू पिकाचा नाद असल्याने गेल्या वर्षीपासून ते तंबाखूचे पीक सुधारित पद्धतीने घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

10 गुंठ्यात एक ट्रक शेणखत सोडले त्याचाच जास्त लाभ झाल्याचे ते सांगतात. केवळ दर्जेदार व चांगली पिकवायचे म्हणुन त्यांनी हे पीक केले आहे. आठ फूट उंचीच्या रोपांना अडीच ते साडे तीन फूटाची एकेक पाने आहेत. एका रोपापासून साधारणता 600 ते 800 ग्रॅम तंबाखू उत्पादित होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. एक झाड सात ते आठ फूट उंचीचे      (साधारण तंबाखूची उंची दीड पुरुष) असून हा तंबाखू पाहण्यासाठी विविध गावांचे विविध राज्यातील शेतकरी भेट देत आहेत. तंबाखूच्या पिकांच्या बाबतीत बोलताना उदगट्टी यांनी पारंपारिक पीक तंबाखूची येथील प्रत्येक शेतकरी थोड्या तरी क्षेत्रामध्ये  लागवड करीतच असतात. त्याच प्रमाणे आपणही दहा गुंठ्यांमध्ये एक पीक केले आहे. 

गेल्यावर्षी असेच पीक आले होते पण पिकांना आधार नसल्यामुळे तंबाखूची रोपे भुईसपाट झाली होती. यंदा ते टाळण्यासाठी मल्चिंग पेपर अंथरून त्यात रोप लावले. त्यानंतर बांबू व ताराने रोपांना आधार दिला त्यामुळे यंदा सात ते आठ फूट उंचीची रोपे वादळवाऱ्यात ही खंबीरपणे उभी आहेत.
 पॉली हाऊसमध्ये प्रथमच पानमळ्याचे पारंपारिक पिक सुधारित पद्धतीने करण्यासाठी त्यांनी 2013 साली  हंचिनाळ येथील आपल्या मित्राच्या पॉलिहाऊसमध्ये पानाचे एक रोप लावले व पॉलिहाऊसमध्ये हे पीक चांगले येते ह्याची खात्री करून घेतली. त्यानंतर दोन वर्षे त्यांना पॉलीहाऊसच्या सबसिडीसाठी दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागली. 

 2016- 17 ला त्यांनी 8 लाख रुपये खर्चून पॉलीहाऊस तयार केले. त्यापैकी चार लाखाची सबसिडी मिळाली. पॉलीहाऊसमध्ये पानमळ्याचे वेल चांगले येते की नाही याबाबत शंका होती.
 ही वेल अत्यंत नाजुक असल्याने त्याला थंडीचा फटका बसतो. त्याला उष्णता हवी असते याची जाणीव झाल्याने त्यांनी तीस गुंठे जमिनीत पानमळा केले. तसेच खुल्यावर 15 गुंठे जमिनीत पानमळा केला आहे. पहिल्या वर्षी दहा गुंठ्यात 50 ते 60 रुपये प्रति पान दर मिळाला यातून 7 लाख 20 हजार रुपयांचे उत्पादन निघाले. त्यापैकी 2 लाख 20 हजाराचा खर्च वजा जाता पाच लाखाचा थेट नफा झाला असल्याचे उदगट्टी यांनी सांगितले. 

कोणतेही पीक चांगले येण्यासाठी शेणखताची अत्यंत गरज असल्याचे ते म्हणतात. एकरी सहा ते आठ ट्रक शेणखत सोडल्यास रोगाचे प्रमाण कमी व रोग प्रतिकारशक्ती वाढते. आपण केलेल्या अंबाडा पानमळ्याच्या पिकाला  रासायनिक खते सोडावी लागत नाहीत. त्यामुळे सेंद्रिय पद्धतीच्या पानांची चव वेगळी असते. पॉलिहाऊस पिके करताना काही ठिकाणी पॉलिहाऊसमध्ये बांबुंचा वापर करण्यात येतो. वेल चढविण्यासाठी बांबू ऐवजी प्रथमच स्टीलचा वापर करण्यात आला आहे. हा प्रयोग यशस्वी झाला. 

गावातच सौद्यामुळे वाहतुक खर्चाची बचत 

येथे पिकलेली पाने विक्रीसाठी  गावातच मंडई असून जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून शेतकरी येथे पानांच्या सौद्यासाठी येतात. सौद्यात पानांची विक्री केल्यामुळे वाहतूक खर्च वाचतो. दर आठवड्यात तीन दिवस येथे सौद्ये होतात.

हेही वाचा - Success Story : युवा प्रयोगशील शेतकऱ्याने माळरानाचे केले नंदनवन; दोडकाच बनवला ब्रॅंड -

तीन राज्यात पानांची निर्यात

येथील पानांची कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या तीन राज्यात निर्यात केली जाते. मुंबई, नागपूर, हैदराबाद, गुजरात, औरंगाबाद, उस्मानाबाद, सावंतवाडी, फोंडा, कुडाळ, कसाळ, सांगली, कोल्हापूर, पुणे अशा शहरात पाने पाठवली जातात. 

पॉलिहाऊसमधिल पहिलाच पानमळा

पॉलिहाऊसमध्ये पानमळा करण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्याने कर्नाटक व महाराष्ट्रातील सुमारे पंधराशे शेतकऱ्यांनी या पॉलिहाऊसला भेट देऊन पाहणी केली आहे. 

"शिरगाव येथे निम्म्याहून अधिक शेतकरी पानमळा व तंबाखूचे पिक करतात. पण नवीन शेतकरी व शेतमजूर या व्यवसायात येत नसल्यामुळे अडचण असते. तरी शिरगाव येथे कर्मचाऱ्यांची गरजेनुसार उपलब्धता होते. इकडे पिकवलेले अंबाडा पान औषधी असून कशायसाठी वापर केला जातो. तसेच मसाला पानासाठी अधिक वापर केला जातो. पान खाल्ल्यामुळे कशाचे अनेक विकार दूर होतात. त्यामुळे या पानाला चांगली मागणी आहे. आपण पिकलेल्या तंबाखू व पानमळे ही पिके चांगले येण्यास शेणखतच कारणीभूत आहे. नवोदित शेतकऱ्यांनी सुधारित तंत्राचा वापर करून शेती केल्यास निश्चितच त्यांना लाखो रुपयाचा फायदा मिळविता येणे शक्य आहे."

- भीमा उदगट्टी, शेतकरी शिरगाव

 

संपादन - स्नेहल कदम