
ठिकपुरली येथील अक्षय चौगले यांची शेतीत आपली वेगळी छाप उमटावी म्हणून प्रयत्न सुरु आहेत.
कोल्हापूर : शेती म्हटलं की कष्ट, तोटा, कमी पैसे आणि जास्त धडपड असाच समज आहे. ग्रामीण भागातील काही ठराविक युवक सोडले तर शेतीकडे वळणारा आणि शेतीकडे सकारात्मक बाजूने पाहणारा वर्ग तुलनेने खूप कमीच आहे. परंतु, या सगळ्याला फाटा देत राधानगरीतील तरूण अभियंत्याची नोकरी सोडून आजोबा आणि वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक पद्धतीचा वापर करून शेती फुलवितोय. तालुक्यातील ठिकपुरली येथील अक्षय चौगले असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. शेती क्षेत्रात आपली वेगळी छाप उमटावी म्हणून अक्षय शेतात नव-नवे प्रयोग करत आहे.
अक्षय याला लहानपणापासून शेतीची आवड. वडिलोपार्जित शेती हा व्यवसाय असल्याने उदरनिर्वाहाचे साधन म्हणून याकडे पाहिले. 2012 - 13 ला बारावीनंतर अक्षयने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तो एका खासगी कंपनीत नोकरीला लागला. परंतु, शेतीची आवड असल्याने नोकरीत मन रमेना. अखेर चालू नोकरी सोडून आधुनिक पद्धतीने, अभ्यासपूर्ण आणि तांत्रिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला.
अक्षयने सुरुवातीला ग्रींनहाऊसच्या साह्याने जरबेरा फुलांची शेती केली. ती साधारण पाच वर्षे सुरू होती. दोन गुंठे शेतीत लाखोचे उत्पन्न मिळवले. त्यानंतर पारंपरिक शेतीमध्ये ऊस, झेंडूच्या विविध जातींची पीके घेतली. एक नवीन प्रयोग म्हणून त्याने एका वर्षासाठी शेवंतीच्या झाडांची लागवड केली.
तांत्रिक साधनांवर भर देऊन शेतीत फेरबदल करुन पीक घेतले तर शेतीचा पोत वाढतो आणि पुढे येणारे पीक जास्त नफा मिळवून देते हे त्याच्या लक्षात आले. आपल्या तांत्रिक शिक्षण आणि अभ्यासाच्या जोरावर वेगवेगळी पिके घेण्यास त्याने सुरुवात केली. नवीन प्रयोग करत व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून लॉकडाउन दरम्यान त्याने रोपवाटिका सुरू केली.
या व्यवसायाची सुरुवात करण्याआधी त्याने अनेक रोपवाटिकांना भेटी दिल्या. जयसिंगपूर येथील अर्जुन गायकवाड आणि शिवाजी उत्तरे यांच्या हायटेक रोपवाटिकांमध्ये लागवड कशी केली जाते, याचे निरीक्षण आणि अभ्यास केला. लॉकडाउन दरम्यान त्याने स्वतःची रोपवाटिका सुरू केली. यामध्ये सुरुवातीला उसाची (डोळे) रोपे लावली. सुरुवातीला अगदी कमी प्रमाणात आणि हळूहळू हे प्रमाण वाढवत नेले. एवढेच नाही तर रोपवाटिकेमध्ये खरेदी करायला येणाऱ्या शेतकऱ्यांना रोपे खरेदी केल्यापासून, त्याची वाढ, त्यासाठी लागणारे खत, औषध फवारणी कशी करावी याचे मार्गदर्शन तो करतो.
रोपांच्या वाढीसाठी काय करावे याविषयी तो माहिती सांगतो. त्यासोबत हंगामानुसार विविध पालेभाज्या आणि फळे भाज्यांची रोपे तयार करून त्यांची विक्री करतात. कोबी, फ्लॉवर, मिरची अशी विविध भाज्यांची रोपे तो तयार करतो.
सुरवातीला थोडे कष्ट आणि त्यानंतर नफा या सूत्राने मी करतो असे अक्षय सांगतो. रोपवाटिकेच्या माध्यमातून मी गेल्या पाच ते सहा महिन्यात लाखांचा व्यवसाय केला आहे. याआधीही मी अनेक नविन प्रयोग करून शेतीतून लाखो रुपये मिळवले आहेत. तांत्रिकदृष्ट्या आणि अभ्यासपूर्ण शेती केल्याने शेतीत तोटा होण्याची शक्यता खूप कमी असतो असेही त्याने सांगितले.
"भविष्यात मला ऑर्किडची शेती करायची आहे. मी आजवर शास्त्र, तंत्रज्ञान आणि अभ्यास करुन या तीनही गोष्टींची सांगड घालून शेती केली आहे. याचा मला चांगला फायदा झाला आहे. युवकांनीही शेतीकडे तांत्रिक दृष्ट्या पाहिल्यास एक उत्तम व्यवसाय म्हणून शेती संस्कृती पुढे येईल."
- अक्षय चौगले, शेतकरी
संपादन - स्नेहल कदम