इचलकरंजीत उसाला तुरा 

ऋषीकेश राऊत
Monday, 30 November 2020

गळीत हंगामास विलंब, ऊसतोड मजुरांचा तुटवडा, बदलते वातावरण याचा विपरीत परिणाम ऊस पिकावर प्रकर्षाने दिसत आहे. ऊसाला लांबलचक तुरे आले असून उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.

इचलकरंजी : गळीत हंगामास विलंब, ऊसतोड मजुरांचा तुटवडा, बदलते वातावरण याचा विपरीत परिणाम ऊस पिकावर प्रकर्षाने दिसत आहे. ऊसाला लांबलचक तुरे आले असून उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. तुरा आलेला ऊस शेतात दीड महिन्याच्या पुढे राहिला तर पांगशा फुटून ऊस पोकळ पडतो आणि उत्पादन घटते. त्यामुळे तुरा आलेल्या उसाची लवकर तोडणी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. 

सध्या जेथे ऊस शेती आहे तेथे नजर जाईल तेथेपर्यंत फक्त तुरेच आल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अवकाळी पावसात कोमजलेले आर्थिक चक्र गळीत हंगामामुळे उमलण्याची शक्‍यता शेतकऱ्यांना होती. उसाला फुटलेल्या तुऱ्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. ऊस शेतीतील तुऱ्याची स्थिती पाहता उसाची तोडणी होणे गरजेचे आहे. सध्या साखर कारखान्यांच्या यंत्रणेला तुरे आलेले ऊस तोडणी करणे चिंताजनक आहे. हा ऊस असाच दीड-दोन महिने पुढे गेला तर ऊस पोकळ पडण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे या उसाची तोडणी होणे गरजेचे आहे. 

यामुळे तुऱ्याचे वाढले प्रमाण 
ज्यावर्षी पावसाचे प्रमाण ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जास्त असते त्यावर्षी तुऱ्याचे प्रमाण अधिक असते. यंदा ऑगस्ट, सप्टेंबरला पावसाने झोडपल्यामुळे जमिनीत पाण्याचे प्रमाण जास्त राहिले. याचा परिणाम तुऱ्याच्या वाढीवर झाला. तसेच दिवसाचे व रात्रीचे तापमान यामधील फरक कमी असल्याचा परिणामही तुऱ्याच्या पोषकतेला कारणीभूत ठरला. 

या जमिनीत तुरा लवकर 
या वर्षी पावसाचे प्रमाण अधिक राहिल्याने पाण्याचा निचरा योग्य झाला नाही. यामुळे अशा पाणथळ जमिनीतील उसाला जास्त प्रमाणात तुरा आल्याचे दिसून येत आहे. जास्त पाऊस झालेल्या भागात उथळ व निचऱ्याच्या जमिनीत असलेल्या नत्राचा ऱ्हास झाल्यामुळे पीकाच्या वाढीसाठी आवश्‍यक असणाऱ्या पोषण द्रव्यांचे प्रमाण कमी झाले. अशा ठिकाणी ऊसाला तुरा लवकर आला आहे. 

तुऱ्यामुळे ऊस उत्पादनात घट 
तुरा आला की उसाची वाढ थांबून पक्वता येते. परंतु हा ऊस शेतामध्ये दीड दोन महिन्याच्या पुढे तसाच राहिला तर ऊस पोकळ बनतो. साखरेचे विघटन होऊन ग्लुकोज व फ्रुक्‍टोज या विघटीत साखरेमध्ये रूपांतर होते. पोकळ बनल्याने तंतूमय पदार्थाच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे रसाचा उतारा साधारण 20 टक्‍क्‍यापर्यंत घटतो. त्यामुळे ऊस उत्पादनात सुमारे 20 ते 25 टक्के घट होऊन याचा मोठ्या प्रमाणावर साखर उताऱ्यावर परिणाम होतो. 

हंगामाला उशीर होणार
यंदा उसाला तुरे आल्याची गंभीर परिस्थिती आहे. महाराष्ट्र व कर्नाटकातील काही भागात ऊसतोड मजूर विखुरले गेले आहेत. ऊसतोड मजुरांच्या कमतरतेमुळे यंदा गळीत हंगामाला उशीर होणार आहे. त्यामुळे ऊसाला आलेल्या तुऱ्याचा परिणाम उताऱ्यावर जाणवणार आहे. 
- अभिजीत गडदे, तालुका कृषी अधिकारी 

संपादन - सचिन चराटी

 

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugarcane Production Likely To Decline In Ichalkaranji Kolhapur Marathi News