
मकर संक्रांतीसाठी सुगडी करण्याचे काम; राज्यभरातून वाढती मागणी
कोल्हापूर : मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर फिरत्या चाकावर मातीला आकार देणारे हात आता इलेक्ट्रिकल यंत्रावरही तितक्याच सफाईदारपणे फिरू लागले आहेत. खुपिरे (ता. करवीर) येथील सुमारे शंभरभर कुटुंबांचे हात सध्या सुगडी तयार करण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, जुन्या पद्धतीने चाक फिरवण्याऐवजी इलेक्ट्रॉनिक यंत्रामुळे विशिष्ट वयानंतर येणारा कंबरदुखीचा त्रास कमी झाला.
जरी सुलभता आली असली तरीही मातीला दैवत्व देणाऱ्या कुंभार समाजाच्या कौशल्याला अजूनही तोड नाही, असेच चित्र येथे आहे. दरम्यान, खुपिरेत तयार होणाऱ्या बुंडुकल्यांना राज्यभरातून मागणी वाढली आहे.
सण कोणताही असो, जुनी परंपरा सांभाळताना नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेत कुंभार समाजाचे योगदान नेहमीच मोलाचे राहिले आहे. गावातील कुंभार समाज या कामांत व्यस्त असला तरी खुपिरेतील समाजाने हा व्यवसाय विस्तारला आहे. येथील समाजाच्या नव्या पिढीतील मुलीही घर व शिक्षण सांभाळत मातीकाम करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत.
हेही वाचा- हिंदकेसरी खंचनाळे यांचे स्मारक उभारणार ः पालकमंत्री सतेज पाटील -
माझे शिक्षण नाही; परंतु मी फौंड्रीत नोकरीला असल्याने नवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा, हे माहीत असल्याने त्याचा विचार करून नवीन मशिन बनविली. त्यामुळे कमी कष्टात जास्त उत्पादन तयार होऊ लागले.
- जयसिंग कुंभार, खुपिरे.
खुपिरे येथील बुंडूकली चांगल्या प्रतीची, मुबलक आणि योग्य भावात मिळतात. त्यामुळे आम्ही दहा ते पंधरा वर्षे खुपिरे येथूनच ती नेतो आणि ग्राहकांसाठी उपलब्ध करतो.
- सुभाष कुंभार, येडेनिपाणी, सांगली.
जुन्या पद्धतीच्या मातीच्या चाकावरील मातीकाम वाकून करावे लागायचे; पण आता यंत्रामुळे पाठीचा व कंबरदुखीचा त्रास कमी झाला आहे.
- दौलू कुंभार, खुपिरे.
संपादन- अर्चना बनगे