स्वाभिमानीची ऊस परिषद होणार ऑनलाईन 

सुनील पाटील 
Friday, 30 October 2020

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची यंदाची ही 19 वी ऊस परिषद आहे.

कोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 19 वी ऊस परिषद ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. सोमवारी (ता. 2) जयसिंगपूर येथील विक्रमसिंह मैदानाऐवजी कल्पवृक्ष गार्डन येथून दुपारी 2 ला फेसबुकच्यामाध्यमातून ऑनलाईन होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी आज दिली. निर्णय होण्याआधी धुराडे पेटणाऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्टाईल दाखवून दिली जाईल, असा इशाराही प्रा. पाटील यांनी दिला. 

श्री पाटील म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची यंदाची ही 19 वी ऊस परिषद आहे. जयसिंगपूर येथील विक्रमसिंह मैदानावरच ही परिषद घ्यावी, यासाठी जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी शाही दसऱ्यासह इतर कार्यक्रम रद्द केले आहेत. आपणही आपली ऊस परिषद ऑनलाईन पध्दतीने घ्यावी असे आवाहन केले होते. त्यानुसार संघटनेची सामाजिक बांधिलकी व कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी यंदाची ऊस परिषद ऑनलाईन पध्दतीने घेतली जाणार आहे. प्रत्येक वर्षी पालकमंत्री सर्व अधिकारी, कारखानदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी दोन ते तीन बैठक घेवून उसाचा पहिला हप्ता किती असवा यासाठी चर्चा करतात. यावर्षीही पालकमंत्र्यांनी ही बैठक घेणे नैतिक जबाबदारी आहे. मात्र, ते प्रयत्न करण्याऐवजी स्वत:चाच कारखाना सुरु करण्याबाबत आग्रही दिसत आहेत. खरतर ते आपली नैतिक जबाबदारी टाळत आहेत, असे दिसत असल्याची टिकाही श्री पाटील यांनी केली. प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी, अन्यथा आम्हाला गनिमी काव्याने उत्तर द्यावे लागले. आरेला कारे म्हणायची भूमिका घेतली आहे. हे विसरू नका. असा इशाराही प्रा. पाटील यांनी दिला. 

हे पण वाचाउद्या ठरणार ऊस दर ; कारखानदार आणि शेतकरी संघटनेची बैठक

सोमवारी (ता. 2) होणाऱ्या ऊस परिषदेत जो निर्णय होईल, त्यानंतर निणर्याची अमलबजावणी करण्यासाठी आरपारची लढाई लढावी लागली तरी लढण्याची तयारी आहे. कोरोनाचे सामुहिक भूमिका पार पाडली पाहिजे. म्हणून आम्ही ऑनलाईन परिषद घेत आहे. मात्र, याचा कोण गैरफायदा घेत असेल तर त्याला स्वाभिमानी स्टाईलने उत्तर दिले जाईल. दरम्यान, गेल्या गळीत हंगामातील एफआरपीनूसार दर दिलेला नाही, अशा साखर कारखान्यांना गाळप परवानगी देवू नये, अशी मागणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली असल्याचेही प्रा. पाटील यांनी सांगितले. 

संपादन - धनाजी सुर्वे  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swabhimanis sugarcane conference will be online