अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे आता आणखी सुकर

ओंकार धर्माधिकारी
Tuesday, 22 September 2020

अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी विद्यापीठ सॉफ्टवेअर खरेदी करणार आहे. याची निविदा निघाली असून पाच दिवसांत खरेदी प्रक्रिया करण्याची प्रशासनाची तयारी सुरू आहे. या सॉफ्टवेअरमुळे प्रश्‍नपत्रिका विद्यार्थ्यांना देणे, संकलित करणे, तपासणी आणि गुण परीक्षा विभागाच्या प्रणालीत जोडणे ही सर्व कामे सुकर होणार आहेत. कमी कालावधीत अधिक चांगली परीक्षा घेण्यासाठी हे सॉफ्टवेअर उपयुक्त असेल. 

कोल्हापूर ः अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी विद्यापीठ सॉफ्टवेअर खरेदी करणार आहे. याची निविदा निघाली असून पाच दिवसांत खरेदी प्रक्रिया करण्याची प्रशासनाची तयारी सुरू आहे. या सॉफ्टवेअरमुळे प्रश्‍नपत्रिका विद्यार्थ्यांना देणे, संकलित करणे, तपासणी आणि गुण परीक्षा विभागाच्या प्रणालीत जोडणे ही सर्व कामे सुकर होणार आहेत. कमी कालावधीत अधिक चांगली परीक्षा घेण्यासाठी हे सॉफ्टवेअर उपयुक्त असेल. 
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी यंदा मार्च महिन्यात देशभर लॉकडाउन जाहीर केले. याच कालावधीत राज्यातील सर्व महाविद्यालये, विद्यापीठे बंद करण्यात आली. त्यामुळे एप्रिल महिन्यात होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. राज्य शासनाने या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे बंधनकारक आहे. ऑक्‍टोबर महिन्यात या परीक्षा पूर्ण होऊन त्यांचे निकाल जाहीर करण्याचे मोठे आव्हान विद्यापीठ प्रशासनासमोर आहे. परीक्षा ऑनलाईन होणार असल्याने यासाठी एका सॉफ्टवेअरची आवश्‍यकता आहे. या सॉफ्टवेअरमुळे परीक्षा घेणे सोपे होणार असून कमी कालावधीत परीक्षा पूर्ण होतील. हे सॉफ्टवेअर विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रश्‍नपत्रिका देणे, त्या संकलित करणे, तपासणे आणि विद्यार्थ्याचे गुण परीक्षा विभागाच्या प्रणालीत पाठवणे ही सर्व कामे करते. या सॉफ्टवेअरची खरेदी कोण करणार याबाबत संभ्रम होता. मात्र आता विद्यापीठच हे सॉफ्टवेअर खरेदी करणार असून त्याची निविदाही प्रसिद्ध झाली आहे. 

ऑप्शन फॉर्म भरणे आवश्‍यक 
विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या लिंकवर जाऊन तेथील ऑप्शन फॉर्म भरणे आवश्‍यक आहे. लिंकवर आपला पीएनआर नंबर दिल्यावर मोबाईलवर व्हेरीफिकेशन कोड येईल. त्यानंतर ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी स्क्रीनवर दिसेल. यामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन द्यायची याचे पर्याय द्यायचे आहेत, अशी माहिती परीक्षा विभागातून देण्यात आली आहे.

संपादन ः रंगराव हिर्डेकर 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Taking the final year exams is now even easier