हॅलो... आवाज येतो का?; गडहिंग्लजच्या सभेत असाही तांत्रिक घोळ

अवधूत पाटील
Friday, 30 October 2020

तांत्रिक अडथळ्यातच विविध विभागांचा आढावा झाला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाईन सभा घेण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मात्र, नियम पाळताना जनतेचे प्रश्‍न सभागृहात मांडताना पदाधिकाऱ्यांना मर्यादा येत असल्याचे दिसून आले.

गडहिंग्लज : हॅलो... आवाज येतो का? आवाज येत नाही... बोला बोला आवाज येतो... हे काही दूरध्वनीवरील संभाषण नाही. तर येथील पंचायत समितीच्या ऑनलाईन मासिक सभेतील तांत्रिक अडथळा आल्यामुळे पदाधिकारी-अधिकाऱ्यांत झालेले हे संभाषण आहे. या तांत्रिक अडथळ्यातच विविध विभागांचा आढावा झाला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाईन सभा घेण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मात्र, नियम पाळताना जनतेचे प्रश्‍न सभागृहात मांडताना पदाधिकाऱ्यांना मर्यादा येत असल्याचे दिसून आले. सभापती रूपाली कांबळे अध्यक्षस्थानी होत्या. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पंचायत समितीची सभा ऑनलाईन पद्धतीने घेतली जात आहे. यामध्ये तांत्रिक अडथळे येत आहेत. त्यामुळे मागील दोन सभांमध्येही विरोधी सदस्यांनी ऑनलाईन सभेला विरोध केला होता. आजच्या सभेतही तांत्रिक अडथळे आले. आवाज न पोचणे, मांडलेला प्रश्‍न स्पष्टपणे ऐकू न येणे, आढावा देताना मध्येच आवाज बंद होणे अशा समस्या उद्‌भवल्या. प्रत्येक विभागाच्या आढाव्यात हा प्रकार सुरू होता. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना आपले प्रश्‍न मांडताना मर्यादा येत असल्याचे दिसून आले. 

प्रभारी गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हलबागोळ यांनी शिक्षण विभागाचा आढावा घेतला. अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत स्थगितच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी विभागाच्या आढाव्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची माहिती दिली. आज शेवटचा दिवस असून आतापर्यंत 1305 बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले असल्याचे सांगण्यात आले. कोणीही शेतकरी वंचित राहू नये, अशी सूचना बनश्री चौगुले यांनी केली. लाळखुरकतचे लसीकरण सुरू असून आतापर्यंत 12 हजार जनावरांना लस दिल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. आशिष टेकाळे यांनी दिली. 

रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांचा प्रश्‍न चौगुले यांनी उपस्थित केला, तर इंचनाळ येथील रस्त्यावर सीलकोट केले नसल्याकडे विठ्ठल पाटील यांनी लक्ष वेधले. सेस फंडातून मंजूर केलेल्या कामांच्या कागदपत्रांची अद्याप पूर्तता झाली नसल्याबद्दल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. चौगुले यांनी वाघराळी येथील प्रसूती झालेल्या महिलेचा प्रश्‍न उपस्थित केला. या प्रकरणी तक्रार आली आहे. चौकशी सुरू असल्याची माहिती गटविकास अधिकारी शरद मगर यांनी दिली. अंगणवाडी कर्मचारी, आशा स्वयंसेविकांना जाहीर केलेला 500 रुपये प्रोत्साहन भत्ता अद्याप मिळाला नसल्याकडे जयश्री तेली यांनी लक्ष वेधले. बजेटमध्ये तरतूद केली आहे. मान्यता मिळाली नसल्याने विलंब झाल्याचे मगर यांनी सांगितले. 

"उपजिल्हा' नॉन कोविडला अडचण... 
कोरोना बाधितांचे प्रमाण कमी झाले असले तरी उपजिल्हा रुग्णालयात 25 ते 30 रुग्ण उपचार घेत आहेत. नव्याने येणाऱ्या रुग्णावर 15-20 दिवस उपचार करावे लागतात. त्यामुळे रुग्ण कमी असले तरी उपजिल्हा नॉन कोविड रुग्णालय करण्यात अडचणी आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यास नॉन कोविड रुग्णालय करता येईल, असे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप आंबोळे यांनी सांगितले.

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Technical Difficulties At Gadhinglaj's Online Meeting Kolhapur Marathi News