टेंबलाई टेकडीवर लगबग वाढणार, दोन जणांनाच परिसरात प्रवेश 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जुलै 2020

आषाढातील त्र्यंबोली यात्रांना सर्वत्र प्रारंभ झाला असून, केवळ मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी करून परंपरा जपण्याचा निर्णय यंदा सर्वच तालीम संस्थांनी घेतला आहे.

कोल्हापूर : आषाढातील त्र्यंबोली यात्रांना सर्वत्र प्रारंभ झाला असून, केवळ मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी करून परंपरा जपण्याचा निर्णय यंदा सर्वच तालीम संस्थांनी घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर टेंबलाई टेकडी येथील त्र्यंबोली मंदिर दर्शनासाठी बंद आहे. येथेही अधिक गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. कोरानामुक्तीचे साकडे यानिमित्ताने देवीला घालण्यात आले. 

दरम्यान, परंपरेप्रमाणे पोलिसांची त्र्यंबोली यात्रा आज साध्या पद्धतीने साजरी झाली. मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत कालपासून विविध धार्मिक विधी झाले. घरगुती नैवेद्य देवीला अर्पण करण्यासाठी आता टेंबलाई टेकडीवर लगबग वाढणार असली तरी केवळ एक ते दोन जणांनाच मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार आहे. त्याशिवाय ओल्या नैवेद्यापेक्षा कोरडा शिधा देण्यावरही अनेकांनी भर दिला आहे. 

त्र्यंबोली यात्रा काळात पोलिसांच्या यात्रेला पहिल्यापासून एक वेगळे स्थान आहे. यात्रेच्या आदल्या दिवशी त्र्यंबोली मंदिरातील पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पोलिस मुख्यालय परिसरात विविध धार्मिक विधी होतात आणि यात्रेदिवशी सकाळी येथून पालखी मंदिराकडे येते. यंदा मात्र हे सर्व विधी अगदी साध्या पद्धतीने व प्रतीकात्मक स्वरूपात झाले. यात्रेसाठी आता आणखी दोन शुक्रवार व एक मंगळवार मिळणार असून, शासनाचे सर्व नियम पाळत तालमीतच विविध धार्मिक विधी होणार आहेत. 

भाविकांतर्फे विविध विधी... 
कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर प्रादुर्भाव कमी करण्यासाठी भाविकांतर्फे आम्ही मंदिरात विविध धार्मिक विधी करत आहे. सृष्टीचा बिघडलेला समतोल सुरळीत व्हावा आणि सर्व भाविकांना आरोग्यदायी जीवन लाभावे, असे साकडे देवीला घातल्याचे प्रदीप गुरव यांनी सांगितले. 

दृष्टिक्षेप 
- मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी 
- तालीम मंडळांनी घेतला निर्णय 
- पोलिसांची त्र्यंबोली यात्रा साध्या पद्धतीने 
- ओल्या नैवेद्यापेक्षा कोरडा शिधा देण्यावरही भर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The temple will rise almost on the hill