
लाकडी कपाट फोडून ऐवज चोरीस गेल्याचे उघडकीस आले
इचलकरंजी - येथील मुसळे हायस्कूलमागे असलेल्या सिद्धकला कॉलनीतील बंद बंगला चोरट्यांनी भर दिवसा फोडला. यात सहा तोळे सोन्याचे, तर १८० ग्रॅम चांदीचे दागिने असा तीन लाख ६७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
याबाबतची तक्रार डॉ. सुनील विठ्ठल बंडगर (वय ४५) यांनी गावभाग पोलिसांत दिली. येथील सिद्धकला कॉलनीत बंगल्यात डॉ. बंडगर कुटुंबासह भाड्याने राहतात. त्यांनी स्वामी मळ्यात बंगल्याचे बांधकाम सुरू केले आहे. नेहमीप्रमाणे ते सकाळी बांधकामाच्या ठिकाणी गेले होते. त्यांच्या पत्नी बंगल्याला कुलूप लावून जवळच असलेल्या मैत्रिणीकडे गेल्या होत्या. दुपारी डॉ. बंडगर घरी आले असता बंगल्याला कुलूप नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बेडरूममध्ये जाऊन पाहणी केली असता साहित्य विस्कटल्याचे दिसून आले; तर लाकडी कपाट फोडून ऐवज चोरीस गेल्याचे उघडकीस आले. डॉ. बंडगर यांनी माहिती दिली. अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. घटनेची नोंद गावभाग पोलिसांत झाली आहे. सहायक पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार तपास करीत आहेत.
हे पण वाचा - आमदार भारत भालके यांचे कोल्हापूरच्या शाहूपुरी तालमीत कुस्तीचे धडे
एक आत; एक बाहेर
घटनास्थळाशेजारीच असलेल्या गॅस गोदामातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन चोरटे कैद झाले आहेत. यातील एक चोरटा बंगल्यात घुसल्याचे, तर दुसरा दुचाकीस्वार असल्याचे स्पष्ट झाले. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
संपादन - धनाजी सुर्वे