इचलकरंजी पालिकेच्या दोन वाहनांचा विमाच नाही

पंडित कोंडेकर
Saturday, 9 January 2021

इचलकरंजी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे कार्यरत असणाऱ्या दोन रिफ्यूज कॉम्पॅक्‍टर या वाहनांचा विमा नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

इचलकरंजी : पालिकेच्या आरोग्य विभागाकडे कार्यरत असणाऱ्या दोन रिफ्यूज कॉम्पॅक्‍टर या वाहनांचा विमा नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन्ही वाहने वर्षभरापूर्वीच खरेदी करण्यात आली होती. यातील एका वाहनाला कचरा डेपो येथे काही दिवसांपूर्वी आग लागली होती. त्यामध्ये मोठे नुकसान झाले होते. मात्र विमा नसल्यामुळे या नुकसानीची जबाबदारी कोणाची हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. यात आरोग्य विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप नगरसेवक शशांक बावचकर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे नुकसानीची जबाबदारी निश्‍चित करण्याची मागणी केली आहे. 

पालिकेने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाअंतर्गत कॅम अविदा कंपनीकडून सुमारे एक कोटी रुपये किमतीच्या दोन रिफ्यूज कॉम्पॅक्‍टर ही कचरा वाहतुकीची दोन वाहने 27 नोव्हेंबर 2019 रोजी खरेदी करण्यात आली आहेत. या वाहनांचे पासिंग करतांना थर्ड पार्टी इन्शुरन्स वाहने पुरविणाऱ्या कंपनीकडून करण्यात आले होते. त्याची मुदत 29 नोव्हेंबर 2020 रोजी संपले आहे. त्यामुळे नव्याने विमा उतरविण्याची आवश्‍यकता होती. पण, पालिकेच्या आरोग्य विभागाकडून याकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले. विशेष म्हणजे या दोन्ही वाहनांचे स्मार्ट कार्डही अद्याप आरटीओ विभागाकडून मागविण्यात आले नाही. 

यातील एका वाहनाला 15 डिसेंबर रोजी कचरा डेपोवर कचरा टाकण्यासाठी गेल्यानंतर अचानक आग लागली. यामध्ये चालकाची केबिनसह अन्य पार्ट जळून खाक झाले. याबाबतचा पंचनामाही करण्यात आला आहे. हे वाहन कचरा उठाव करीत असलेल्या आदर्श फॅसिलीटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस यांच्याकडे दिले आहे. या वाहनाचा उतरविण्यात आलेल्या विम्याची मुदत संपली होती. 

मुख्याधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्‍चितीची मागणी 
नव्याने विमा उतरविण्यात आलेला नाही. त्यामुळे या वाहनाचे झालेले लाखो रुपयांचे नुकसान कोण देणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर नगरसेवक बावचकर यांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन या वाहनाच्या नुकसानीची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर निश्‍चीत करुन त्याची वसुली करण्याची मागणी केली आहे. 

 

संपादन  सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There Is No Insurance For Two Vehicles Of Ichalkaranji Municipality Kolhapur Marathi News