कोल्हापूरकरांनी आज अनुभवली अनोखी पहाट  

thick fog in kolhapur
thick fog in kolhapur

कोल्हापूर - आजची पहाट उजाडली ती दाट धुक्‍याच्या सहवासातच. भल्या पहाटे फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांनी आल्हादायक वातावरण अनुभवले. धुक्‍याची दाट चादर शहरावर पसरली. मन प्रसन्न करणाऱ्या अनोख्या वातावरणाचे शहरवासिय आज साक्षीदार झाले. 

गेल्या चार महिन्यापासून असलेले कोरोनाचे सावट, कधी कोणाची दु:खद बातमी कानावर पडेल याचा नेम नाही. अशा स्थितीत एका वेगळ्या वातावरणामुळे मनावरचा ताण थोडा का असेना पण हलका झाला. पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला असताना तसेच ऑक्‍टोबर हिटचे चटके डोके वर काढत असताना सकाळचे वातावरण मात्र दिलासा देणारे ठरले. पहाटेपासूनच दाट धुक्‍यामुळे थोड्या अंतरावरील काही नजरेस पडत नव्हते.

चारचाकी तसेच दुचाकी वाहनांची वर्दळ सुरू होताच त्यांना लाईट लावून पुढे जाण्याशिवाय पर्याय नव्हता. धुक्‍याच्या वातावरणात व्यायामाचा आनंद काही वेगळाच असतो. फिरायला जाणारे, सायकलवरून फेरफटका मारणारे, सुर्यनमस्कार तसेच योगासन करणाऱ्यांसाठी आज पर्वणीच होते. पानाफूलावर दवबिंदू दाटून आले. पावसाची बारीक सर असते. तसे दवबिंदू डोक्‍यावर साचून राहिले. महाबळेश्‍वर, पाचगणी, आंबोली, पन्हाळा, आंबा तसेच गगनबावड्या एरव्ही गेल्यानंतर दाट धुके नजरेस पडते तसेच काहीसे चित्र आज अनुभवास मिळाले. 
नदीघाटाचा परिसर, रंकाळा तलाव, शिवाजी विद्यापीठाचा परिसर, कृषि महाविद्यालय, राजाराम बंधारा परिसर,रिंगरोड धुक्‍यात हरवून गेले. 

ग्रामीण भागात सध्या भात कापणीची लगबग सुरू आहे. धुक्‍यातून शेताची वाट शोधत शेतकऱ्यांची धांदल सुरू होती. हाती खुरपे घेऊन शेताच्या दिशेने निघालेले महिला तसेच पुरूषांची धांदल सुरू होती. धुक्‍याचे वातावरण अनेकांनी मोबाईलमध्ये कैद केले. काहींनी व्हिडिओ करून ते व्हॉटसऍप ग्रुपला सेंड केले गेले. नऊपर्यंत वातावरण असेच आल्हाददायक होते. सुर्याची किरणे जमीनीवर पसरू लगली तसे धुक्‍याची चादर हलकी होत गेली. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com