'पुढे येऊ नकोस, पुढे आलास तर, जिवे मारतो', अशी धमकी देत लुटणाऱ्या चोरट्याला अटक...

सोमवार, 29 जून 2020

आरोपी मजगावचा; गावठी पिस्तूल, 3 लाखाचे दागिणे जप्त

बेळगाव - 'पुढे आलास तर, जिवे मारतो', असे धमकावून आणि पिस्तुलीचा धाक दाखवत हिंडलगा रोड, विजयनगर येथील सराफाला लुटणाऱ्याला कॅम्प पोलिसांनी आज (ता.29) अटक केली. त्याच्याकडून सुमारे 3 लाखाचे दागिणे व गावठी पिस्तूल आणि चोरीसाठी वापरलेली दुचाकी जप्त केली. वैभव राजेंद्र पाटील (वय 29, रा. ज्ञानेश्‍वरनगर, मजगाव) असे त्याचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, हिंडलगा रोड, विजयनगरला सचिन नारायण बांदिवाडेकर (रा. गुमटमाळ, हिंडलगा) यांच्या मालकीचे समृध्दी ज्वेलर्सचे दुकान आहे. 27 जूनला सायंकाळी साडे सहाच्या सुमारास सुमारे 25 ते 30 वयाचा तरुण दागिणे खरेदीच्या बहाण्याने पोचला. सराफ बांदीवडेकर यांनी वेगवेगळे डिझाईन्स असलेले चार नेक्‍लेस काढून टेबलवरील एका ट्रेमध्ये ठेवली. ट्रेमधील चारी नेक्‍लेस संशयित आरोपीने ताब्यात घेतले आणि त्यानंतर खिशातील पिस्तूल बाहेर काढत सराफाच्या दिशेने रोखून धरली. 'पुढे येऊ नकोस, पुढे आलास तर, जिवे मारतो', असे धमकावत तेथून दुचाकीवरून धूम ठोकली. या विरोधात बांदीवडेकर यांनी कॅम्प पोलिसांत फिर्याद दिली. 3 लाखाचे 4 नेक्‍लेस चोरीला गेल्याची फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात विरोधात गुन्हा नोंदविला. चौकशी सुरु केली. पण, 3 दिवसांत प्रकरणाचा छडा लावला. आरोपी वैभव पाटीलला अटक केली. त्याच्याकडून तीन लाखाचे चार नेक्‍लेस, गावठी पिस्तूल जप्त आणि तीन बंदुकीच्या गोळ्या जप्त केल्या. आरोपीकडून चोरीसाठी वापरलेली दुचाकीही जप्त केली आहे.

वाचा - कोल्हापुरातील गणेशोत्सव मंडळे कोरोनाविरोधातील लढाईला देणार बळ ; सकाळचा पुढाकार

पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराज, पोलीस उपायुक्त सीमा लाटकर, पोलीस आयुक्त यशोदा वंटगुडी यांच्या मार्गदर्शनाखाली व एसीपी ए. चंद्राप्पा यांच्या नेतृत्वाखाली कॅम्प पोलीस निरीक्षक डी. संतोषकुमार यांनी कारवाई केली. कारवाईत एएसआय बी. आर. डूग, एस. एम. बांगी, एम. वाय. हुक्केरी, बी. बी. गौडर, एम. ए. पाटील, बी. एम. नरगुंद, बी. एस. रुद्रापूर, ए. बी. घट्टद, यू. एम. थैकार, एस. एच. तळवार आदींनी भाग घेतला होता.

पिस्तूल असलीच...

सराफाला लुटणाऱ्याकडे बनावट पिस्तूल मिळाल्याचे पोलिसांनी सुरवातीला सांगितले होते. पण, चौकशीत बंदूक असल्याचे स्पष्ट झाले. पिस्तूल व बंदुकीच्या गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. संशयिताने दागिणे लुटण्याचा ज्यावेळी प्रयत्न केला. त्यावेळी बंदुकीचा धाक दाखवण्यासाठी पिस्तूल बाहेर काढली. तसेच झटापट झाली होती. यावेळ संशयिताने पिस्तूल चालवण्याचा प्रयत्न केला. पण, घाईगडबडीत ते शक्‍य झाले नाही. अन्यथा मोठा अनर्थ घघडला असता अशी भिती घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी आता व्यक्त केली आहे.