ऍपमधील त्रुटीमुळे एकच सर्व्हे तीनवेळा करण्याची वेळ 

नंदिनी नरेवाडी 
बुधवार, 1 जुलै 2020

एकाचवेळी अनेक कामे करावे लागत असताना "आशा कर्मचाऱ्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

कोल्हापूर : कोरोना विषाणूचा धोका सर्वात जास्त ज्येष्ठ नागरिकांना आहे. इतर आजारांमुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमजोर होते. या ज्येष्ठ नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी अर्सेनिक अल्बम औषधांच्या वाटपाचे काम आशा कर्मचाऱ्यांकडे दिले आहे. तसेच त्यांची माहिती घेण्यासाठी "महाआयुष' सर्व्हेही करत आहेत. मात्र हा सर्व्हे "आशा कर्मचाऱ्यांसाठी' डोकेदुखी ठरत आहे. ऍपमधील तांत्रिक अडचणींमुळे एकच सर्व्हे तीनवेळा करण्याची वेळ आशा कर्मचाऱ्यांवर आली आहे. 

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. आरोग्य दुत असणाऱ्या "आशा' या काळात दुप्पट काम करावे लागते. एकाचवेळी अनेक कामे करावे लागत असताना मनस्तापालाही सामोरे जावे लागत आहे.

ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रत्येक घरी जाऊन घरातील प्रत्येक सदस्यांचे थर्मल स्कॅनिंग करणे, ऑक्‍सिपल्स चेक करणे, महिन्याभरातील प्रवासाची नोंद घेणे, बाहेरगावावरून आल्यास गृह अलगीकरणाचा शिक्का मारणे, त्यांच्यावर देखरेख करणे, ज्येष्ठ नागरिकांची नोंद घेणे, त्यांना औषधांचे वाटप करणे अशी कामे त्या करत आहेत. याचदरम्यान डेंगी व इतर साथीचे आजार आल्याने त्याचीही माहिती शासनाकडे पाठवावी लागते. 

महाआयुष सर्व्हे करताना शासनाने दिलेल्या ऍपवर एक अर्ज ऑनलाईन भरावा लागतो. त्यामध्ये व्यक्तीचे नाव, स्थलांतरीत असल्यास त्याची नोंद घेणे, मोबाईल क्रमांक, इतर आजार, त्याची लक्षणे, प्रवासाचा इतिहास अशी माहिती भरावी लागते.

मात्र, या ऍपमध्ये काही तांत्रिक अडचणी असल्याने सर्व्हे पूर्ण होत नाही. हा सर्व्हे झालाच नसल्याचे वरिष्ठ स्तरावरून सांगण्यात येते. त्यामुळे आशा कर्मचाऱ्यांना एक सर्व्हे पूर्ण करण्यासाठी तीन तीन वेळा हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यासोबतच हा सर्व्हे पूर्ण करण्यासाठी विधानसभा मतदारसंघाची यादी दिली आहे. या यादीतील काही नावे आशांच्या कार्यक्षेत्रात येत नाहीत. त्यामुळे कार्यक्षेत्र बदलून प्रवासाचा खर्च घालून आशा कर्मचारी हा सर्व्हे पूर्ण करत आहेत. त्यातही अडचणी येत असल्याने आशा कर्मचाऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 
 

घरातील फ्रीजमधील पाणीही तपासा... 
डेंगीची साथ शहरासह ग्रामीण भागात पसरली आहे. या काळात सर्व्हे करताना नकारात्मक मानसिकतेला सामोरे जावे लागत असताना आता डेंगीच्या अळ्या होऊ नयेत यासाठी घरोघरी जाऊन पाण्याच्या साठवणूकीच्या भांड्याच्या तपासणीचे काम आशांना दिले आहे. घरातील फ्रीजमधील पाणीही तपासा, अशा सुचना त्यांना आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभुमीवर घरात येऊन तपासणी करणाऱ्या "आशां'ना विरोध होत असल्याचे चित्र काही ठिकाणी आहे. 

महाआयुष सर्व्हे करताना आशा कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. ऍपमधील तांत्रिक अडचणींमुळे एक सर्व्हे दोन ते तीनवेळा करावा लागतो. यात तिचे पैसे व वेळ दोन्ही वाया जातात. तसेच मतदार यादी दिल्यामुळे कार्यक्षेत्रातही बदल होतो. मतदारयादीतही अनेक चुका आहेत. 
- नेत्रदीपा पाटील, अध्यक्षा, आशा व गटप्रवर्तक युनियन 

ही करावी लागतात कामे... 
- अर्सेनिक अल्बम औषधांच्या वाटपाचे काम 
- माहिती घेण्यासाठी "महाआयुष' सर्व्हे करणे 
- घरोघरी प्रत्येक सदस्यांचे थर्मल स्कॅनिंग करणे 
- ज्येष्ठ नागरिकांची नोंद घेणे 
- बाहेरगावाहून आल्यास गृह अलगीकरणाचा शिक्का मारणे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Time to do the same survey three times