पत्नीच्या मृत्यूनंतर चोवीस तासातच माजी उपमहापौरांचा मृत्यू

Twenty four hours after the death of his wife the former deputy mayor died in belgaum
Twenty four hours after the death of his wife the former deputy mayor died in belgaum

बेळगाव : बेळगावचे माजी उपमहापौर व महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते कल्लाप्पा मुरारी प्रधान (वय-83) यांचे गुरूवारी (13) हृदयविकाराने निधन झाले. बुधवारी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यांच्या पत्नीवर बुधवारी सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले होते. गुरूवारी येथील सदाशिवनगर स्मशानभूमीत ते रक्षा विसर्जन कार्यक्रमासाठी जाणार होते, पण त्याआधीच त्यांच्या घरीच त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यानंतर तातडीने त्याना शहरातील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचाराचा फायदा झाला नाही.

चोविस तासातच पती-पत्नी दोघांचेही निधन झाल्यामुळे संपूर्ण बेळगाव शहरात व सीमाभागात हळहळ व्यक्त होत आहे. कल्लाप्पा प्रधान यांचे मूळ गाव चंदगड तालुक्‍यातील जक्कनहट्टी पण बेळगाव हीच त्यांची कर्मभूमी होती. शिवाजीनगर येथे त्यांचे वास्तव्य होते. शिवाजीनगर येथूनच ते तीनवेळा महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. 1987 साली त्यांची बेळगावच्या उपमहापौरपदी निवड झाली. याशिवाय विविध स्थायी समित्यांचे अध्यक्ष म्हणूनही त्यानी कामकाज पाहिले.

1987 साली ऍड. नागेश सातेरी हे महापौर होते, त्यावेळी प्रधान हे उपमहापौर होते. त्यावेळी ऍड. सातेरी यांना आखिल भारतीय महापौर परीषदेसाठी कोलकता येथे जावे लागले होते. ऍड. सातेरी यानी त्यावेळी महापौरपदाची जबाबदारी दहा दिवसांसाठी प्रधान यांच्याकडे दिली होती. त्याचवेळी तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग बेळगावला आले होते. प्रधान यांनी सांबरा विमानतळावर जावून त्यांचे स्वागत केले होते. भारदस्त व्यक्तीमत्व असलेले झैलसिंग यांचे स्वागत छोट्या चणीच्या व कमी उंचीच्या प्रधान यांनी केले. त्यावेळी गळ्यात हार घालून घेण्यासाठी झैलसिंग यांना झुकावे लागले होते. तो प्रसंग सातत्याने महापालिका वर्तुळात चर्चेत येत असे.

सामाजिक कार्यातही प्रधान अग्रेसर होते. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या व सीमाप्रश्‍नाच्या प्रत्येक लढ्यात त्यांचा सहभाग होता. तीन वर्षांपूर्वी माजी नगरसेवक संघटनेची स्थापना बेळगावात झाली. त्या संघटनेचे प्रधान सदस्य होते, संघटनेच्या सर्व उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. दुपारी अडीच वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक मोहन चिगरे, अमर येळ्ळूरकर, सतीश मार्दोळकर, मिनाक्षी चिगरे आदी उपस्थित होते. त्यांच्या मागे दोन विवाहीत मुली, एक मुलगा, सून, नातवंडे असा परीवार आहे. रक्षा विसर्जन शुक्रवारी (ता.14) सकाळी आठ वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत होणार आहे. 

संपादन - अर्चना बनगे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com