राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ ; दोन स्वयंचलित दरवाजे उघडले 

राजू पाटील
Thursday, 15 October 2020

गेल्या आठ दिवसापासून रोज पावसाची हजेरी होती. मात्र कालपासून एकसारखा पाऊस सुरू असल्याने राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याची आवक अचानक वाढली.

राशिवडे बुद्रुक (कोल्हापूर) : दोन दिवसांच्या संततधार पावसामुळे राधानगरी तालुक्यातील सर्वच धरणाच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ झाली आहे. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील दाजीपूर अभयारण्य परिसरात झालेल्या पावसामुळे धरण पाणी पातळी कमाल क्षमतेपेक्षा अधिक वाढल्याने या धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे आज दुपारी खुले झाले. यातून व विज गृहातून असे मिळून 4256 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सध्या भोगावती नदी पात्रात सुरू झाला आहे. तर काळम्मावाडी धरण विजगृहातूनही पाणी सोडण्यात आले आहे. 

पावसामुळे भात पिकाचे मोठे नुकसान होत आहे. मात्र दुपारनंतर पावसाने उसंत घेतल्याने दरवाजे बंद होवून विसर्ग थांबण्याची शक्यता आहे.

 गेल्या आठ दिवसापासून रोज पावसाची हजेरी होती. मात्र कालपासून एकसारखा पाऊस सुरू असल्याने राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याची आवक अचानक वाढली. यामुळे हे धरण सरासरी पाणी पातळी पेक्षा अधिक संचय झाल्याने आज दुपारी साडेबारा वाजता एक स्वयंचलित दरवाजा खुला झाला. तर त्यानंतर पाठोपाठच पंधरा मिनिटांनी दुसरा ही स्वयंचलित दरवाजा खुला झाला आहे. तत्पूर्वी पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज सकाळपासून विज गृहातून चौदाशे क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र तरीही दोन दरवाजे खुले झाल्याने यातून 2856 व वीज गृहातून 1400 असा 4256 क्यूसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरू झाला आहे. यामुळे नदी पात्राबाहेर पाणी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

हे पण वाचा पाऊस उठला शेतकऱ्यांच्या पोटावर ; हातातोंडाशी आलेला घास घेतला हिरावून 

दरम्यान, दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र धरण क्षेत्रावर दिसून येत आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक कमी झाल्यास खुले झालेले दरवाजे कोणत्याही क्षणी बंद होऊ शकतात. अशी माहिती येथील शाखा अभियंता प्रकाश सुतार यांनी दिली.
 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two automatic doors opened for kolhapur radhanagari dam