‘जिसका कोई नही उसका खुदा है यारो’

Two wheeler mechanic Sachin Balasaheb Pawar story
Two wheeler mechanic Sachin Balasaheb Pawar story

रमणमळा : ‘जिसका कोई नही उसका खुदा है यारो,’ या गीताचा अर्थ तसा साधा-सोपा. माणसातील माणूसपण जागे झाल्यानंतर मात्र देवाकडे धाव घेण्याची गरज उरत नाही, असा संदेश टू व्हिलर मेकॅनिक सचिन बाळासाहेब पवार देतो.

ज्याला कोणाचा आधार नाही, त्याच्यापाठी तो सावलीसारखा उभा राहतो. तसं त्याच काम दुचाकी गाड्यांच पंक्‍चर काढण्याचं. त्यात आईच्या आजारपणावर पैसा नेहमीच खर्च होतो. तरीही त्याच्यातला सेवाभाव भारी ठरलाय. दिव्यांग व निराधार धनाजी निवृत्ती जाधव यांच्याशी त्याची चांगलीच दिलजमाई आहे. जाधव यांच्या आयुष्याची परवड होत असताना त्यांचा तो मोठा आधार ठरलाय.

सचिनचे मूळ घर शनिवार पेठेतले. कुटुंबाचा आकार मोठा झाल्यानंतर वडील बाळासाहेब व आई जयश्री शाहूपुरीतील पाचव्या गल्लीत राहायला आले. त्याचे वडील गांधीनगरमध्ये खासगी वाहनावर ड्रायव्हर होते. आई नेहमी आजारी पडत असल्याने सचिनची शिक्षणात फारशी प्रगती झाली नाही. त्याने दहावीपर्यंत मजल मारली. मित्र सागर पवार याच्या सायकल दुकानात तो कामाला लागला. दुचाकी गाड्यांच्या दुरुस्तीची कामे शिकला. आयर्विन ख्रिश्‍चन हायस्कूलच्या चौकात त्याने स्वत:चे जोतिबा टायर गॅरेज सुरू केले. सात वर्षांपूर्वी त्याच्या गॅरेजच्या दारात जाधव आले. त्यांची विचारपूस केल्यावर त्यांना कोणाचा आधार नाही, हे समजले. जाधव कनाननगरमधील असून, त्यांचा रेल्वेखाली अपघात झाला होता. त्यात त्यांना एक पाय गमवावा लागला. कधी स्टर्लिंग टॉवर, तर कधी व्हिनस कॉर्नर परिसर येथे त्यांचा मुक्काम सुरू झाला. सचिनची भेट झाल्यानंतर तो त्यांना घरातून डबा आणून देतो. कधी नाश्‍त्यासाठी पैसे देतो. आजारी असतील तर औषधोपचारासाठी पैसे देतो. दिव्यांग जाधव यांना कृत्रिम पाय व हात बसविण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. 
सचिनला पत्नी संगीताचे नेहमीच पाठबळ मिळाले. त्या पेस्ट्री केक तयार करतात. मुलगा समर्थ व मुलगी सारिका शिकत आहेत. तो प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या उपक्रमांतही सहभागी होतो. 

गॅरेजमधून जेमतेम पैसा हाती मिळतो. त्यातून घरखर्चाला हातभार लागतो. मदतीच्या अपेक्षेने कोणी आले तर त्याला ती करायला हवी, या भावनेने मी मदत करतो. माझी आई सतत आजारी असते. तिची जशी काळजी घेतो, तशीच इतरांची घेतो. 

- सचिन पवार, मेकॅनिक


संपादन - धनाजी सुर्वे  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com