इंटरमिजिएट, एलिमेंटरी परीक्षेबाबत संभ्रम
यंदाच्या शैक्षणिक वर्षात सर्वच परीक्षांना कोरोनाचा फटका बसला आहे. इंटरमिजिएट व इलिमेंटरी या परीक्षा सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात दरवर्षी होत असतात.
महागाव : यंदाच्या शैक्षणिक वर्षात सर्वच परीक्षांना कोरोनाचा फटका बसला आहे. इंटरमिजिएट व इलिमेंटरी या परीक्षा सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात दरवर्षी होत असतात. इतर परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे; पण कला संचालनालयाकडून या परीक्षांचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. त्यामुळे या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
शालेय पातळीवर इंटरमिजिएट व एलिमेंटरी या शासकीय चित्रकला महत्त्वाच्या मानल्या जातात. यंदा कला संचालनालयाकडून अद्यापही या बाबतीत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नसल्याने विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना एलिमेंटरी परीक्षा द्यायची होती, त्यांनी सरावही सुरू केलेला आहे. त्यांच्यापुढेही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या परीक्षा होणार आहेत की नाहीत? तसेच पुढील व्यावसायिक व शैक्षणिक प्रवेशासाठी या परीक्षांचे अतिरिक्त गुण मिळत असल्याने या गुणांचे काय होणार, असे प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. पाचवी व आठवी शिष्यवृत्ती, एन.एम.एम.एस. व इतर परीक्षांचे आवेदन पत्राचे वेळापत्रक जाहीर झाल्याने त्यामुळे कला संचालनालयाकडून लवकरात लवकर परीक्षेबाबत स्पष्टता होण्याची गरज आहे, अशी मागणी होत आहे.
दहावी परीक्षेत अतिरिक्त गुण
एलिमेंटरी व इंटरमिजिएट उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दहावीमध्ये क्षेणीनिहाय अतिरिक्त गुण मिळतात; पण वेळापत्रक जाहीर नसल्याने व परीक्षेबाबत अस्पष्टता असल्याने चित्रकला परीक्षेच्या अतिरिक्त गुणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लवकर वेळापत्रक जाहीर व्हावे
इंटरमिजिएट व एलिमेंटरी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेबरोबर इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अतिरिक्त गुण असतात. या अतिरिक्त गुणांबाबत विद्यार्थ्यांचे नुकसान न करता कला संचालनालयाकडून लवकरात लवकर वेळापत्रक जाहीर व्हावे.
- संजय देसाई, उपाध्यक्ष, कला अध्यापक, शिक्षक संघटना, कोल्हापूर
संपादन - सचिन चराटी
kolhapur