esakal | ऊस परिषदेवर कोरोनाचे सावट
sakal

बोलून बातमी शोधा

Uncertainty Over Sugarcane Council Kolhapur Marathi News

ऊस दराची मागणी आणि आंदोलनाची दिशा ठरवणाऱ्या यंदाच्या विसाव्या ऊस परिषदेचे स्वरूप बदलणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाकडून ऊस परिषदेला परवानगी मिळणार का, यावरच परिषदेचे स्वरूप निश्‍चित होईल.

ऊस परिषदेवर कोरोनाचे सावट

sakal_logo
By
गणेश शिंदे

जयसिंगपूर : ऊस दराची मागणी आणि आंदोलनाची दिशा ठरवणाऱ्या यंदाच्या विसाव्या ऊस परिषदेचे स्वरूप बदलणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाकडून ऊस परिषदेला परवानगी मिळणार का, यावरच परिषदेचे स्वरूप निश्‍चित होईल. ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या ऊस परिषदेची प्राथमिक तयारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सुरू आहे. प्रशासनाने परवानगी नाकारली तरी राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परिषद घेऊन दराची मागणी आणि आंदोलनाची दिशा स्पष्ट केली जाणार आहे. 

दरवर्षी जयसिंगपूर येथे ऊस परिषदेत उसाचा दर निश्‍चित केला जातो. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील शेतकरी आणि शेतकरी चळवळीतील नेत्यांची आवर्जून उपस्थिती असते. बाजारातील साखरेचे दर, उसाचे क्षेत्र, उत्पादन खर्चाचा मेळ घालत ऊस परिषदेत ऊस दराची मागणी केली जाते. त्यामुळे दरवर्षी साखर कारखान्यांची धुराडी पेटण्याआधी स्वाभिमानीच्या ऊस परिषदेकडे कारखानदार आणि शेतकऱ्यांचे लक्ष लागून असते.

चार वर्षांपूर्वी नगरपालिका निवडणुकीमुळे प्रशासनाने पालिकेपुढील विक्रमसिंह मैदानावर ऊस परिषदेला परवानगी नाकारली. त्यामुळे शहरातच पण पर्यायी जागेवर परिषद घ्यावी लागली. याआधी कोल्हापुरात एक-दोन परिषदांचा अपवाद वगळला तर सर्व ऊस परिषदा या जयसिंगपूर येथील विक्रमसिंह मैदानावरच झाल्या आहेत. यावर्षी कोरोनामुळे प्रशासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना राबवल्या जात आहेत. ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यात विसावी ऊस परिषद घेण्याबाबत संघटनेत खल सुरू असून, सध्याच्या परिस्थितीमुळे कोणता निर्णय घ्यावा याबाबत मते आजमावली जात आहेत. कोरोनाची स्थिती व प्रशासनाची परवानगी यावरच परिषदेचे स्वरूप निश्‍चित होईल. 

संघटना, कारखानदारांचीही कसरत
यंदा कोरोनामुळे ऊस परिषदेचे स्वरूप बदलणार असतानाच कारखानदारांचीही कोंडी झाली आहे. विदर्भ, मराठवाड्यात यावर्षी चांगला पाऊस झाल्याने मजूरांकडून शेतीकडे कल वाढला आहे. दुसरीकडे मजूर आलेच तरी त्यांची आरोग्य तपासणी, त्यांचे क्वारंटाईन तसेच त्यांची पुढील जबाबदारी अशा पातळ्यांवर कारखानदारांना खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे संघटनेबरोबर साखर कारखानदारांचीही कसरत होणार आहे. 

दर ठरवून यावर्षी नेटाने आंदोलन करू
यावर्षी कोरोनामुळे ऊस परिषदेचे स्वरूप कसे असावे, याबाबत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मते आजमावली जात आहेत. मात्र, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी आणि नेते परिषदेला उपस्थित राहात असतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कसा राहणार यावर परिषदेचे स्वरूप निश्‍चित करता येईल. मात्र, उसाचा दर ठरवून यावर्षी नेटाने आंदोलन करू. 
- राजू शेट्टी, संस्थापक, स्वाभिमानी शेतकरी संघटना 

संपादन - सचिन चराटी

go to top