मुमेवाडी घाटात ओशाळली माणुसकी

सोमवार, 1 जून 2020

आजरा-कोल्हापूर रस्त्यावर मुमेवाडी घाटात बहिरेवाडी (ता. आजरा) गावच्या हद्दीत पंचरत्न नावाचे हॉटेल आहे. त्यापासून 200 फूट अंतरावर अनोळखी पुरुषाचा मृतदेह असल्याची माहिती आजरा पोलिसांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी पाहणी केली. रस्त्याच्या कडेला रक्ताचे थारोळे पडले होते. यावरून अवजड वाहन गेल्याने टायरला लागलेल्या रक्ताचे ठसे स्पष्ट दिसत होते. घटनास्थळावरून पंधरा फूट अंतरावर एका पुरुषाचा मृतदेह फरफटत नेऊन गटारात टाकला होता

उत्तूर,  ः रस्त्यात अपघात झाला की, अपघातग्रस्तास मदत करण्यासाठी धावाधाव होते; मात्र इथे घडले वेगळेच. रात्रीच्या वेळी रस्त्याकडेने चालत जाणाऱ्या एका व्यक्तीला वाहनचालकाने धडक दिली. यामध्ये त्याचा पाय मोडला. डोक्‍याला गंभीर जखम झाली. रक्त वाहायला लागले. त्याला उपचारासाठी दवाखान्याला घेऊन जाणे, पोलिसांना खबर देणे हे दूरच राहिले. जखमीला सुमारे पंधरा फूट फरफटत नेऊन जवळच्या गटारात फेकले आणि वाहनासह पोबारा केला. 
आजरा-कोल्हापूर रस्त्यावर मुमेवाडी घाटात बहिरेवाडी (ता. आजरा) गावच्या हद्दीत पंचरत्न नावाचे हॉटेल आहे. त्यापासून 200 फूट अंतरावर अनोळखी पुरुषाचा मृतदेह असल्याची माहिती आजरा पोलिसांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी पाहणी केली. रस्त्याच्या कडेला रक्ताचे थारोळे पडले होते. यावरून अवजड वाहन गेल्याने टायरला लागलेल्या रक्ताचे ठसे स्पष्ट दिसत होते. घटनास्थळावरून पंधरा फूट अंतरावर एका पुरुषाचा मृतदेह फरफटत नेऊन गटारात टाकला होता. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहाची झडती घेतली. मात्र तंबाखूच्या पुडी शिवाय या ठिकाणी काहीही सापडले नाही. यामुळे या मृतदेहाची ओळख पटविण्याचे पोलिसासमोर आव्हान बनले आहे. 
मृतदेहाच्या अंगावर लाल रंगाचा फूल शर्ट व काळ्या रंगाचा पॅन्ट आहे. ही व्यक्ती परप्रांतीय असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. बहिरेवाडीचे सरपंच अनील चव्हाण यांनी फिर्याद दाखल केली. घटनास्थळी विभागीय पोलिस अधिकारी अंगद जाधववर, आजरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे यांनी भेट दिली. या अपघाताबाबत कोणास माहिती असल्यास त्यानी आजरा पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार बी. एस. कोचरगी करीत आहेत.