युनायटेड राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा रद्द

दीपक कुपन्नावर
Saturday, 7 November 2020

गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनने यंदा दिवाळीतील लोकवर्गणीतुन होणारी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यावर्षी या स्पर्धेचे सतरावे वर्ष होते.

गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनने यंदा दिवाळीतील लोकवर्गणीतुन होणारी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यावर्षी या स्पर्धेचे सतरावे वर्ष होते. कोरोनामुळे अद्याप प्रशासकिय स्तरावर क्रीडा स्पर्धांना परवाणगी नसल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याचे असोसिएशनच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. फुटबॉल स्पर्धेची पंरपंरा लक्षात घेऊन कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावर डिसेंबरमध्ये राज्यस्तरीय स्पर्धा घेण्याचे निश्‍चित करण्यात आले. एम. आर. हायस्कुलच्या मैदानावर युनायटेड असोसिएशनच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.

दिवाळी सुट्टीत गडहिंग्लजला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धाची गेल्या अर्धशतकाची पंरपंरा आहे. अजित क्रीडा मंडळाने सत्तरच्या दशकात या आंतरराज्य स्पर्धेची मुर्हुतमेढ रोवली. महागाईमुळे मध्यंतरी ही पंरपंरा खंडीत झाली. गडहिंग्लजकरांचे फुटबॉलप्रेम लक्षात घेऊन गडहिंग्लज युनायटेडने सन 2004 पासुन ही पंरपरा पुन्हा सुरू केली. या स्पर्धेत सातत्य ठेवण्यासह देशातील फुटबॉलमधील प्रगत केरळ, गोवा, पंजाब, कर्नाटक, आध्रंप्रदेश राज्यापर्यंत या स्पर्धेचा विस्तार करून स्पर्धा राष्ट्रीय स्तरापर्यत पाहोचवली. 

बैठकीच्या सुरवातीला युनायटेडचे सचिव दिपक कुपन्नावर यांनी स्वागत करुन राज्य, क्रेंद्र शासनाचे कोरोनाकाळातील क्रीडा स्पर्धा भरविण्यासाठीच्या नियमांची माहिती दिली. स्पर्धा गडहिंग्लजकरांच्या मदतीतुन होत असल्याने प्रेक्षकांविना स्पर्धा घेण्याचा पर्याय स्विकारू नये, असे युनायटेडचे अध्यक्ष अरविंद बार्देस्कर यांनी स्पष्ट केले. त्याएवजी कोरोनाचा प्रभाव ओसरल्यावर डिसेंबरमध्ये राज्यस्तरीय स्पर्धा घेऊन पंरपरा जोपासावी, अशी सुचना ज्येष्ठ संचालक सुरेश कोळकी यांनी केली. ती एकमताने मंजुर करण्यात आली. या वेळी उपाध्यक्ष मल्लिकार्जुन बेल्लद, खजिनदार महादेव पाटील, संचालक संभाजी शिवारे, प्रा. सुनिल शिंत्रे, प्रशांत दड्डीकर, भैरू सलवादे, मनिष कोले उपस्थित होते. 

स्पर्धेत पहिल्यांदाच खंड 
सतरावर्षापासून सुरू असलेल्या या स्पर्धेत यंदा पहिल्यांदाच खंड पडत आहे. मोठमोठ्या शहरात महागाईमुळे स्पर्धा इतिहासजमा होताना ग्रामीण भागात युनायटेडने गडहिंग्लजकरांच्या मदतीने चिकाटीने ही पंरपरा जपली आहे. नेटके नियोजन, स्टेडियमची बैठक व्यवस्था नसतानाही शौकिनांचा सामने पाहण्यासाठी होणारी तुडुंब गर्दी यामुळे भारतीय फुटबॉलमधील सर्वोच्च आयलिग स्पर्धा खेळणारे केरळचे स्टेट बॅक त्रावणकोर (एसबीटी), गोकुलुम एफसी, बंगळुरचा भारत हेवी इलेक्‍ट्रीकल्स लिमिटेड (बीईएमएल), गोव्याचा वास्को स्पोट्‌स, स्पोर्टिंग क्‍लब, मंबईचा आँईल अँन्ड नॅंचरल गॅंस (आएनजीसी), पुणे फुटबॉंल क्‍लब या सारख्या दिग्गज संघानी हजेरी लावुन गडहिंग्लजच्या फुटबॉलप्रेमाला सलाम केला आहे. 

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: United National Football Tournament Canceled Kolhapur Marathi News