चोरीचा माल विकण्यासाठी येणार असल्याचे समजले अन्‌, चंदगड तालुक्‍यातील घरफोडीचा लावला पाच दिवसात छडा

सुनील कोंडुसकर
Tuesday, 1 September 2020

माणगाव (ता. चंदगड) येथील घरफोडी प्रकरणी संशयीत चोरटा संदेश रविंद्र फडके (वय 20, रा. माणगाव) याला पोलिसांनी अटक केली.

चंदगड : माणगाव (ता. चंदगड) येथील घरफोडी प्रकरणी संशयीत चोरटा संदेश रविंद्र फडके (वय 20, रा. माणगाव) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून साडे आठ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हा दाखल झाल्यापासून पाच दिवसात तो उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. 

7 ऑगस्ट रोजी गावातील बंद घराचे कुलूप फोडून चोरट्याने रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने मिळून 11 लाख 34 हजार 500 रुपयांचा माल लंपास केला होता. 25 ऑगस्टला याबाबत पोलिसांत तक्रार दाखल झाली. पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवला.

पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यराज घुले, हेड कॉस्टेबल नरसिंग कांबळे, शिवाजी पडवळ, शिवाजी खोराटे, प्रल्हाद देसाई, सचिन देसाई, संजय पडवळ, संजय चाचे, रणजित कांबळे, सुरेश पवार, रफीक आवळकर यांच्या पथकाने तपास सुरू केला. तक्रारदाराने गावातील संदेश फडके याच्यावर संशय व्यक्त केला होता. त्याच्यावर पाळत ठेवली.

30 तारखेला तो चोरीचा माल नेसरी येथे विकण्यासाठी येणार असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. त्याच्याकडून रोख रक्कम 5 लाख रुपये तसेच 57 ग्रॅम सोन्याचे, 575 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले. त्याची किंमत साडे आठ लाख रुपये होते. संशयीत संदेश फडकेला येथील न्यायालयात हजर केले असता 4 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. पोलिस निरीक्षक अशोक सातपुते तपास करीत आहेत. 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unravel The Theft In Chandgad Taluka Kolhapur Marathi News