वळिवाची कोल्हापूर शहरास हुलवाणी, जिह्यास झोडपले

वळिवाची कोल्हापूर शहरास हुलवाणी, जिह्यास झोडपले

कोल्हापूर  ः जोरदार वारे आणि वीजांच्या कडकडाटासह आज जिल्ह्यातील ग्रामीण भागाला पावसाने अक्षरशः झोडपले. कोडोली- वाठार मार्गावर तळसंदे गावाजवळ मोठी झाडे उन्मळून पडल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या. रात्री उशिरापर्यंत झाडे हटवण्याचे काम सुरू होते. दरम्यान, शहरात मात्र काही परिसरात हलकासा शिडकावा करत पावसाने हुलकावणीच दिली. 
सकाळपासूनच आज उन्हाचा तडाखा कायम होता. मात्र, सायंकाळी ढग दाटून आले. जिल्ह्यात विविध ठिकाणी जोरदार पावसाला सुरवात झाली. गार वाऱ्यामुळे शहरातही एकूणच गारवा पसरला. वीजांच्या कडकडाटामुळे जोरदार पावसाची शक्‍यता असल्याने त्यादृष्टीने तारांबळ उडू नये, यासाठी प्रयत्न सुरू झाले. पण, शहरात पावसाने अखेर हुलकावणी दिली. 

घुणकी, परीसरात मोठे नुकसान

घुणकी : आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह किणी, घुणकी, चावरे,तळसंदे, पारगांव, निलेवाडी, पाडळी, मनपाडळे, अंबप परीसराला झोडपल्याने शाळा इमारती, घरे,जनावरांच्या गोट्यावरील पत्रे,झाडांचे मोठे नुकसान झाले. वाठार-वारणानगर मार्गावरील वाठार नजीक रस्त्यावर सहा ठिकाणी झाडे पडल्याने रात्री उशिरापर्यंत वाहतूक ठप्प होती. अंबप येथील राजेंद्र हायस्कूलच्या इमारतीवरील पत्रे उडून नुकसान झाले. घरे, जनावरांच्या गोट्यावरील पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले. वाठार-वारणानगर मार्गावर वाठार नजीक झाडे पडल्याने वाहतूक ठप्प झाली. 

सातवे परिसरात कौले पत्रे उडाले 
सातवे ः सातवे परीसरात गुरुवारी सायकांळी साडेसहाच्या सुमारास जोरदार वारा व विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस झाला. पाऊसापुर्वी सुरू झालेल्या अर्धा तास जोरदार वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे पडली काही ठिकाणी विद्युत तारा तुटून वीज पुरवठा खंडीत झाला आहे तर गावातील घरावरील कौले, पत्रे उडून गेले असून प्रांपचिक साहित्याचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर शेतामधील अनेक ठिकाणी विद्युत तारेवर झाडाच्या फांद्या पडल्या असून आरळे, सावर्डे गावात पडझड झाली आहे. 

कोडोलीत वीज पुरवठा खंडीत 
कोडोली : कोडोली व परीसरात गुरुवारी सायकांळी साडेसहाच्या सुमारास जोरदार वारा व विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस 
झाला. सायंकाळी पाऊस सुरू होणे पुर्वी अर्धा तास जोरदार वारा सुटला होता. या वाऱ्यात अनेक घरावरील पत्रे व कौले उडून गेली तसेच काही झाडे पडल्याची घटना घडली . घरावरील पत्रे व कौले उडाल्याने प्रांपचिक साहित्याचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. जोरदार वारा असलेने विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. कोडोली गावात साखरवाडी, चर्चरोड, दत्तमठी या ठिकाणी तर शेतामधील अनेक ठिकाणी विद्युत तारेवर झाडे पडल्याची घटना घडल्या. 
बोरपाडळे : बोरपाडळेसह शहापूर,माले,मोहरे,काखे,मिठारवाडी,आंबवडे,देवाळे,आवळी,नावली,पैजारवाडी आदि परिसराला पावसाने हजेरी लावली. पोर्ले तर्फे ठाणे ः आसुर्ले-पोर्ले परिसरात सायंकाळी सात वाजता तुरळक पाऊस झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. 

धामोड पपरिसरात हलक्‍या सरी 
धामोड : आज दुपारी पाच वाजता धामोड व म्हासूर्लीसह (ता. राधानगरी ) परिसरात हलक्‍या स्वरूपाचा पावसाचा शिडकावा झाला. उन्हाळी भुईमूग, भात कापणीत पावसाने व्यत्यय आला. वीट व्यावसायिकांची धावपळ उडाली. धामोडसह, लाडवाडी ,कोते, चांदे, आपटाळ, खामकरवाडी ,केळोशी या परिसरात पावसाने थोडासा शिडकावा केला. 

चंदगडमध्ये जोरदार पाऊस 
चंदगड : तालुक्‍याच्या निम्या भागाला आज जोरदार वळीव पावसाने झोडपून काढले. वेगवान वाहणारे वारे. ढगांचा गडगडाट आणि चमकणाऱ्या विजांसह सुमारे तासभर पाऊस कोसळला. चंदगड, नागणवाडी, हलकर्णी, पाटणे फाटा, तुर्केवाडी या पट्ट्यात हा पाऊस झाला. हेरे ( ता. चंदगड) येथे सायंकाळी पाचच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. विजासुद्धा मोठ्या प्रमाणात चमकत होत्या. याच वेळी बसस्थानकाजवळील मिलिंद फर्नांडीस यांच्या नारळीच्या झाडावर वीज कोसळली. झाडाने त्वरित पेट घेतला. वरून पाऊस कोसळत असताना सुद्धा हे झाड बराच वेळ पेटत होते. 


आजरा तालुक्‍यात पावसाच्या सरी 
आजरा ः तालुक्‍यात आज पावसाच्या सरी कोसळल्या. साडेतीन नंतर पावसाला सुरवात झाली. वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. सुमारे दोन तास पाऊस सुरु होता. 

गडहिंग्लजला पावसाची हुलकावणी 
गडहिंग्लज : आज दुपारपासून शहर आणि तालुक्‍यात ढगाळ वातावरण होवूनही पावसाने हुलकावणी दिली. खरीपपूर्व शेती मशागतीसाठी आवश्‍यक असणाऱ्या या पावसाकडे शेतकऱ्यांचे डोळे लागलेले आहेत. दोन दिवसापूर्वी तालुक्‍यात काही ठिकाणी वळीव पाऊस झाला असला तरी तो कमी स्वरूपात होता. चांगला वळीव पाऊस पडला तरच शेती मशागतींची कामे वेग घेणार आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com