वंचित बहुजन आघाडीतर्फे एसटी विभागीय कार्यालयासमोर हलगी आंदोलन 

vanchit bahujan aghadi protest in kolhapur
vanchit bahujan aghadi protest in kolhapur

कोल्हापूर : सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर जिल्ह्यातर्फे आज एसटी विभागीय कार्यालयासमोर हलगी आंदोलन केले. आघाडीतर्फे एसटी विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांना निवेदन दिले.

सध्या घातलेली जिल्हा बंदीही ताबडतोब उठवावी, अशी मागणीही वंचित बहुजन आघाडीने केली. 

निवेदनातील माहितीनुसार, कोरोना रोखण्यासाठी जे आरोग्य विषयक सुरक्षिततेचे नियम आहेत. त्याचे काटकोर पालन करत सर्व व्यवहार सुरु करावे. राज्यातील एसटी, मुंबईतील बेस्ट आणि सर्व शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सरकारने त्वरित सुरु कराव्यात. गणपती उत्सवासाठी खासगी बस वाहतूकीचे बुकींग सुरुवात झाले आहे. खासगी सेवा चालू होत असतील तर सरकारने वाहतूक सेवा सुरू करण्यात काय अडचण आहे? सरकारने एसटी आणि बेस्टच्या सेवा तुरळक प्रमाणात सुरू केल्या आहेत; परंतु त्या फार अपुऱ्या आहेत. सार्वजनिक वाहतूक सेवेअभावी लोकांची गैरसोय होत आहे. 

25 मार्चपासून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभर अनेक उपाय योजना केल्या. सार्वजनिक वाहतूक ही बंद केली. कार्यालये, दुकाने, हॉटेल, मार्केट आदीमध्ये लोकांचा संपर्क कमी होईल, अशा प्रकारे सर्व व्यवहारांवर निर्बंध घातले. या चार महिन्यातील कोरोनाच्या प्रसाराचा अभ्यास केल्यानंतर कोरोनाच्या प्रसाराचा पॅटर्न लक्षात घेऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांमध्ये सुधारणा करण्याची आवश्‍यकता आहे. गरीब आणि हातावर पोट असलेल्या बहुसंख्य लोकसंख्येचा रोजगार आणि उद्योग व्यवसाय, अर्थ व्यवहार तातडीने सुरू करण्याची आवश्‍यकता आहे. 

कोरोना विरुद्ध लढण्याची प्रतिकार क्षमता अंदाजे 80 टक्के लोकांनी दाखवली आहे. 15 टक्के लोक वैद्यकीय उपचाराला प्रतिसाद देऊन कोरोनाचा मुकाबला करण्यात यशस्वी झाले आहेत. पाच टक्के लोक असुरक्षित आहेत. हे अद्ययावत वैद्यकीय उपचार देऊनही नियंत्रणात आणता येत नाहीत. 

सरकारने या 15 टक्के अधिक पाच टक्के म्हणजे, 20 टक्के लोकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी सर्व प्रयत्न केंद्रित केले पाहिजेत. कोरोना नियंत्रणाच्या नियोजनाचे हे सुत्र ठेवले पाहिजे. शंभर टक्‍के लोकसंख्येवर निर्बंध घालण्याचे आर्थिक दुष्परिणाम समोर आले आहेत. अर्थव्यवस्था संकटात आहे. 80 टक्केपेक्षा अधिक लोकसंख्येला बेरोजगारी आणि उपासमारीचा सामना करावा लागतो आहे. गेल्या चार महिन्यांचा आढावा घेऊन सरकारने काही निर्णय तातडीने घेतले पाहिजेत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आधीच केलेली आहे. 


 आंदोलनात जिल्हाध्यक्ष विलास कांबळे, संजय गुदगे, संभाजी कागलकर, गणेश कुचेकर, प्रितम कांबळे, दिलीप रणदिवे, किशोर कुरणे, प्रशांत कांबळे, प्रकाश कांबळे आदी उपस्थित होते.

संपादन - धनाजी सुर्वे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com