Virgin mother at home after delivery
Virgin mother at home after delivery

प्रसूतीनंतर कुमारी माता घरी; बाळांचा सांभाळ बालकल्याण संकुलात 

कोल्हापूर : जवळच्या नातेवाईकाने धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केले. त्यातून ती गर्भवती राहिली. गर्भपात करणेही शक्‍य नसल्याने तिला तिच्या पालकांनी बालकल्याण संकुलमध्ये दाखल केले. तिथे ती प्रसूत झाली. मात्र, पालकांनी तिला परत नेण्याचे नाकारले. एका अत्याचाराने तिच्या आयुष्याची परवड झाली. तिला मानसिक धक्‍क्‍यातून सावरण्यासाठी बालकल्याण संकुलमध्ये विशेष प्रयत्न झाले. तिचे पुनर्वसनही झाले. पण, आई-वडील असूनही तिला त्यांच्या प्रेमाला मुकावे लागले. 

चॉकलेट, गोळ्या, खाऊ आदींचे आमिष दाखवून; तर कधी असहायतेचा, अज्ञानाचा फायदा घेऊन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केले जातात. शहरी, ग्रामीण भागात हे चित्र ठळकपणे दिसते. यात प्रेम प्रकरणांबरोबर जवळच्या, ओळखीच्या नातेवाईकांकडूनच अत्याचार होण्याचे प्रमाण अधिक आहे. ज्या वयात करिअर घडविण्यासाठी झटायचे, त्या वयात क्षणिक मोहाला बळी पडून कुमारी माता बनलेल्या मुलींना अवेळी मातृत्वाला सामोरे जावे लागते.

गेल्या तीन वर्षांत बालकल्याण संकुलात 15 कुमारी माता दाखल झाल्या आहेत. प्रसूतीनंतर त्यांना कुटुंबीयांनी घरी परत नेले. मात्र, त्यांच्या बाळांचा सांभाळ बालकल्याण संकुलात केला जात आहे. गरोदर राहिल्यावर चार-पाच महिन्यांनी पालकांना समजते. त्यानंतर तिलाच दोषी मानत पालक तिला संस्थेकडे दाखल करतात. येथे मानसिक आधाराबरोबरच त्यांच्यावर योग्य औषधोपचारही केले जातात. पुन्हा असे प्रसंग होऊ नयेत, यासाठी त्यांचे समुपदेशनही केले जाते, अशी माहिती अधीक्षक नजिरा नदाफ यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

मातृसुरक्षा दिनानिमित्त, अल्पवयीन मुली गर्भवती राहण्याच्या प्रमाणाबाबत विचार करण्याची गरज आहे. अवेळी लादल्या गेलेल्या मातृत्वातून त्यांचे आयुष्य मात्र उद्‌ध्वस्त होत आहे. समाजही त्यांच्याकडे चुकीच्या नजरेतून पाहतो. सध्या हा प्रश्‍न गंभीर बनताना दिसतो आहे. 

कुमारी मातांचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. असे प्रकार रोखायचे असतील तर शाळांमध्ये समुपदेशन वर्ग, लैंगिक शिक्षण, पालक मुलांचा संवाद, जनजागृती कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे. 
- पद्मजा तिवले, मानद कार्यवाह 

भावना जाणून घ्यायला हव्यात... 
पंधरा कुमारी मातांपैकी अनेकांचे पालक उच्चभ्रू समाजातील आहेत. नोकरीमुळे त्यांचा मुलींशी संवाद कमी होता. मुलींचे हट्ट पुरविण्यात मात्र ते मागे राहिले नाहीत. महागडे मोबाईल, पॉकेटमनीसाठी किमान पाचशे-हजार रुपये, ब्रॅंडेड कपडे ते देत राहिले. वेळीच मुलींच्या भावना जाणून घेण्यात ते कमी पडले. मुली गर्भवती झाल्यावर त्यांनी समाजातील पत ढासळायला नको, प्रतिष्ठेला धक्का पोचायला नको, या विचाराने तत्काळ त्यांची बालकल्याण संकुलात रवानगी केली. 


(संपादन : प्रफुल्ल सुतार) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com