यंत्रमाग कामगारांना मिळणार मजुरीवाढ ; जानेवारीपासून होणार अंमलबजावणी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 January 2021

मात्र मजुरीवाढीची अंमलबजावणी यंत्रमागधारक करणार काय, याकडे लक्ष लागले आहे. 

इचलकरंजी (कोल्हापूर) : येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाने यंत्रमाग कामगारांसाठी 52 पिकास 8 पैसे मजुरीवाढ जाहीर केली आहे. 2013 मध्ये झालेल्या करारानुसार ही मजुरीवाढ जाहीर केली आहे. यामुळे यंत्रमाग कामगारांच्या मजुरीत आठवड्याला 150 रुपयांची वाढ होणार आहे. मात्र मजुरीवाढीची अंमलबजावणी यंत्रमागधारक करणार काय, याकडे लक्ष लागले आहे. 

2013 मध्ये यंत्रमागधारक व कामगार संघटनांचा संयुक्त करार झाला होता. मागील वर्षातील सहा-सहा महिन्यांचे दोन महागाई भत्ते एकत्र करून त्याचे रुपांतर पीस रेटमध्ये करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार प्रत्येक वर्षी मजुरीवाढ जाहीर करण्यात येते; मात्र दोन-तीन वर्षांपासून प्रशासनाने मजुरीवाढ जाहीर केल्यानंतरही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. यंत्रमाधारकांनी त्याला नकार दिला आहे. 

हेही वाचा - कोल्हापुरात फुटबॉलपटू दिएगो मॅराडोनाचे स्मारक उभारणार

दरवर्षी प्रशासनाकडून 31 डिसेंबरला मजुरीवाढ जाहीर केली जाते. यंदा मजुरीवाढ जाहीर करण्यास विलंब झाल्यानंतर कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर आज सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांनी मजुरीवाढ जाहीर केली. महागाई भत्त्याची रक्कम पीस रेटवर रूपांतरीत केल्यानंतर 52 पिकास 8 पैसे इतकी मजुरीवाढ झाली आहे. त्याची 1  जानेवारीपासून यंत्रमागधारकांनी अंमलबजावणी करावी, असे आवाहन अपर कामगार आयुक्त शैलेश पोळ व सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांनी केले आहे. 

दीडशे रुपये होणार वाढ 

आज जाहीर केलेल्या मजुरीवाढीची अंमलबजावणी झाल्यास यंत्रमाग कामगारांच्या आठवड्यात मजुरीत 150 रुपये तर महिन्याच्या मजुरीत 600 रुपये वाढ होणार आहे. मात्र यंत्रमागधारकांनी मजुरीवाढीला विरोध केला आहे. त्यामुळे मजुरीवाढीचा लाभ यंत्रमाग कामगारांना होणार काय, हा प्रश्‍न सध्या तरी अनुत्तरीतच आहे. 

हेही वाचा - महानगरपालिकेचे ८१ प्रभाग मोठ्या ताकदीने लढवणार : हसन मुश्रीफ

संघटनांच्या भूमिकेकडे लक्ष 

तीन वर्षांपासून मजुरीवाढीची अंमलबजावणी झालेली नाही. यंदा मात्र मंजुरीवाढीच्या भूमिकेवर यंत्रमाग कामगार संघटना आक्रमक आहेत. त्यामुळे मजुरीवाढीच्या अंमलबजाणीच्या प्रश्‍नावर संघटनांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wages of power room employee increases from this month in ichalkaranji in kolhapur