वीज जोडणी तोडून दाखवाच !

सकाळ वृत्तसेवा | Monday, 23 November 2020

वीज दरवाढविरोधी कृती समितीचा इशारा, शिवाजी पेठेत बैठक  

कोल्हापूर :  कोरोनाकाळात लोकांचे रोजगार गेले आहेत. दुर्बल घटकांकडे पैसे नाहीत, अशा स्थितीत सक्ती ने वीज बिलांची वसुली करणे चुकीचे आहे. हिंमत असेल तर वीज जोडणी तोडून दाखवावी, असा इशारा शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण यांनी दिला. 

वीज दरवाढविरोधी कृती समितीची बैठक शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात आज झाली या वेळी हा इशारा दिला. निवासराव साळोखे अध्यक्षस्थानी होते.  श्री. साळोखे म्हणाले, ‘‘कोरोना संसर्ग काळात लॉकडाउन होता. त्यामुळे महावितरण कंपनीने वीज मीटरचे रीडिंग न घेता सरासरी काढून वीज बिले पाठवली यात वीज दर वाढीचा बोजा वाढवला. लॉकडाउनमुळे लोकांचे व्यवसाय, उद्योग बंद पडले. त्यामुळे अर्थकारणावर विपरित परिणाम झाला, असे असताना महावितरणने वीज बिलांची वसुली सुरू करणे चुकीचे आहे. कोरोना काळातील वीज बिले माफ व्हावीत, यासाठी आंदोलन सुरू आहे. राज्य शासनाने निर्णय घेऊन वीज बिले माफ करावीत तोपर्यंत महावितरण वीज बिलांची वसुली सक्तीने करू नये.’’

हेही वाचा- शाळा सुरू करण्यातील संभ्रम कायम ; शिक्षकांच्या स्वॅब टेस्टसाठी मुदतवाढ

Advertising
Advertising

कोरोना काळातील वीज बिले माफ व्हावीत, यासाठी आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असे प्रतिपादन बाबा पार्टे, मंजित माने, अजित राऊत यांनी केले. याबैठकीस सुरेश जरग, राजू जाधव, राजामाता जिजाऊ ब्रिगेडच्या सुनीता पाटील आदी 
उपस्थित होते.

वीज बिलांची होळी 
ज्यांचे वीज बिल पाच हजार रुपयांवर थकीत आहे. अशांना वीज वितरण कंपनीने नोटीस  काढली आहे. त्यांच्या छायांकित प्रतीसह वाढीव तसेच चुकीच्या वीज बिलांची प्रतीकात्मक होळी करून आंदोलन करण्यात आले.

संपादन- अर्चना बनगे