पाणीपट्टी, करवाढ प्रस्ताव फेटाळले 

Water bars, tax proposals rejected
Water bars, tax proposals rejected

कोल्हापूर : पाणीपुरवठा विभागातील थकबाकी वसूल करा, पाण्याची चोरी, गळती रोखा आणि महापालिकेला पोखरणाऱ्या घुशी बंद करा, अशी मागणी करत नगरसेवकांनी आज पाणी पुरवठा, परवाना, अग्निशमन दल, आरोग्यसेवा आदी करवाढीचे प्रस्ताव फेटाळले. 

कोणत्याही परिस्थितीत करवाढ मिळणार नाही. नागरिकांवर करवाढीचा बोजा टाकणार नाही. अशी भूमिका नगरसेवकांनी घेतली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर निलोफर आजरेकर होत्या. महापलिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात ही सभा झाली. 

पाणी विभागाने पाणी पुरवठा दरात तब्बल 30 टक्के वाढीचा प्रस्ताव आज सर्वसाधारण सभेसमोर ठेवला होता. पाणी विभागाबरोबरच परवाना, आरोग्य, अग्निशमन दलाकडील सेवांचेही करवाढीचे प्रस्ताव मंजुरीसाठी समोर होते. या प्रस्तावांना नगरसेवकांनी तीव्र शब्दात विरोध केला. 

प्रा. जयंत पाटील म्हणाले, "महापालिकेच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. मार्च आला तरी वसुली नाही, याउलट करवाढीचे प्रस्ताव आणण्यात मात्र तत्परता दाखविली जाते. हे बरोबर नाही. प्रशासन काय करतयं, अक्षरक्ष: लुळं पांगळ झाले आहे. त्यांच्या चुकीमुळे आज महापालिकेच्या तिजोरीत पैसा नाही. पगारही उशीरा होतात. प्रशासनाच्या चुकीमुळे विकासावर गदा येत असेल तर ते सहन करणार नाही. 
अशिष ढवळे म्हणाले, "पाणी पुरवठा विभागाने झोपडपट्टीत थकबाकी वसुली सुरु केली आहे. पण एकेका झोपडपट्टीधारकाकडे 50 हजाराची थकबाकी आहे. झोपडपट्टीधारकांचे खायचे वांदे आहेत आणि ते पाणीपट्टीचे 50 हजार कसे देउ शकतील. याचाही विचार व्हावा, यापूर्वी झोपडपट्टीत सरकारी नळ होते, पण ते काढले. आता पुन्हा असे नळ बसविता येतील का? ते पहावे. 

राजसिंह शेळके म्हणाले, पाण्याची मोठ्या प्रमाणात चोरी होते. 40 हजार कनेक्‍शनधारकांना सरासरीची बिले कशी काय जातात? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अजित ठाणेकर यांनी शहरातील किती बेकायदा कनेक्‍शन शोधून पाणी विभागाने त्यांच्यावर कारवाई केली. रुपाराणी निकम म्हणाल्या, राजेंद्रनगर प्रभागात नेहमीच रात्री पाणी पुरवठा केला जातो. 

तरीही पाणी नाही... 
पूजा नाईकनवरे म्हणाल्या, शाहूपूरी परिसर उंच भाग असल्याने याठिकाणी अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने या परिसरात पाच बंगल्याजवळ पाण्याची उंच टाकी बांधून पाच वर्षे झाली. तरीही टाकीत पाण्याचा थेंबही पडलेला नाही. एवढे पैसे खर्च होउनही नागरिकांना पाणी मिळणार नसेल तर त्याचा काय उपयोग आहे. या विभागाला पाणी पुरवठा केंव्हा योग्य दाबाने मिळेल,असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

एलईडीवरुन ये रे माझ्या मागल्या.. 
एलईडी दिवे योग्य व्हॅटचे लावले जात नसल्यावरुन आजच्या सभेत पुन्हा नगरसेवकांनी शहर अभिंयता नेत्रदीप सरनोबत यांना धारेवर धरले. संबधित कंपनीची सरनोबत वकिली का करतात? असा सवाल करण्यात आला. माधुरी लाड, स्वाती यवलुजे, मेहजबीन सुभेदार, शारंगधर देशमुख, सत्यजीत कदम, सुनील कदम, अजित ठाणेकर, किरण नकाते, विजयसिंह खाडे-पाटील आदींनी चर्चेत भाग घेतला. अखेर या कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रस्ताव सभागृहाने मंजुर केला. 

अर्थिक नुकसान करणाऱ्यांना घरचा रस्ता : आयुक्त 
महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, यापुढच्या काळात महापालिकेचे वसुली हेच मुख्य उद्दिष्ट असेल 31 मार्चपर्यंत माझ्यासह सर्वांच्या रजा, सुट्ट्या रद्द केल्या आहेत. घरफाळा, पाणीपट्टी भरण्यासाठी रविवारीही कार्यालये सुरु राहतील. ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे महापालिकेचे नुकसान होत असेल, असे अधिकारी कर्मचारी आमच्याकडे नसले तरी चालतील. पण महापालिकेचे नुकसान आम्ही होउ देणार नाही. चुकीचे काम करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवू. 

शहर 1 मार्चपर्यंत प्लास्टिकमुक्त 
कोणत्याही परिस्थितीत 1 मार्चपर्यंत कोल्हापूर प्लास्टिकमुक्त करण्याचा प्रयत्न आहेत. स्वच्छता मोहीमेत जसे सभागृहाने साथ दिली तशीच साथ या मोहीमेतही हवी असल्याचे आयुक्त कलशेट्टी यांनी सभागृहात सांगीतले. या मोहिमेअंतर्गत लवकरच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनाही कोल्हापूरला निमंत्रीत केले आहे. त्यांच्याही दौरा लवकरच होणार आहे. दरम्यान, कोल्हापुरातील विविध कामासाठी दोन कोटी रुपये उपलब्ध करुन देउ, असे आश्‍वासनही पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्याचे आयुक्तांनी सांगीतले. 

दंड व्याजात सवलत नाही 
घरफाळा थकित रक्कमेवरील दंड व व्याज तसेच थकित पाणीपट्टी दंड व व्याजात नागरिकांना सवलत द्यावी,असा सदस्य ठराव या सभागृहाच्या मान्यतेसाठी ठेवला होता. पण तूर्त हा ठराव मागे घेतला आहे. त्यामुळे या वर्षी दंड आणि व्याजात कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com