"या' तालुक्‍यासाठी आलेल्या बोटी कुलूपबंद, पाण्यातून पोहत करावे लागतेय रेस्क्‍यू ऑपरेशन

Water Boats In Chandgad Taluka Are Locked Kolhapur Marathi News
Water Boats In Chandgad Taluka Are Locked Kolhapur Marathi News

चंदगड : महापुराच्या आपत्कालीन स्थितीत बचावात्मक काम करण्यासाठी तालुक्‍यात दोन मोटारबोट प्राप्त झाल्या; परंतु रेस्क्‍यू ऑपरेशनचे प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांकडे ताबा देण्यावरून वाद सुरू झाल्याने त्या कुलूपबंद आहेत. दोन दिवस या तरुणांनी पुराच्या पाण्यातून चालत आणि पोहत जाऊन नागरिकांना मदत केली. प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणाबद्दल तरुणांनी नाराजी व्यक्त केली. केवळ सामाजिक सेवा म्हणून काम करणाऱ्या या तरुणांना प्रशासनाकडून प्रतिसादाची अपेक्षा आहे. 

गतवर्षीच्या महापुरात किणी व कोवाड (ता. चंदगड) या गावांना मोठा फटका बसला. किणी फाट्यावरील इमारतीला पाण्याचा वेढा पडल्याने सुमारे तेरा नागरिक तीन दिवस अडकून पडले होते. बेळगाव येथील सैन्यदलाच्या तुकडीने त्यांची सुटका केली. भविष्यात अशा स्थितीत मदतकार्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ आणि मोटारबोट व इतर संसाधने गरजेची असल्याचे स्पष्ट झाले. या वर्षी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने तालुक्‍यासाठी खास रेस्क्‍यू ऑपरेशन प्रशिक्षण राबवले.

तालुक्‍याच्या विविध गावांतील 60 तरुणांनी सहभाग घेतला. त्यात किणी येथील सर्वाधिक 15 तरुण होते. या वर्षी प्रशासनाने गरज विचारात घेऊन चंदगड व कोवाड येथे प्रत्येकी एक मोटारबोट उपलब्ध केली; मात्र ही बोट ताब्यात घेताना प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना वाईट अनुभव आला. विविध कारणांनी त्यांना बोट नाकारली गेली. वरिष्ठांकडूनही वेळ मारून नेण्याचाच प्रकार घडला.

शुक्रवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत कोवाड येथे वरिष्ठांची प्रतीक्षा करणाऱ्या तरुणांच्या पदरी निराशाच आली; मात्र समाजसेवेचा वसा त्यांनी आपल्या परीने पार पाडला. काही कुटुंबांना त्यांनी पाण्यातूनच बाहेर काढले. यात वयोवृद्ध व्यक्ती, महिला, तरुणी, लहान मुलांचा समावेश होता. बोट असती तर त्यांची वाट सुकर झाली असती. 

बचावकार्य करून पोहत गावात... 
रेस्क्‍यू ऑपरेशनमध्ये काम करणारे तरुण किणी येथील आहेत. ताम्रपर्णीच्या अलीकडे कोवाड, तर पलीकडे किणी गाव आहे. कोवाड बाजारपेठेतील नागरिकांना मदत करण्यासाठी त्यांना नदीतून पोहत अलीकडे यावे लागते. बोट त्यांच्या ताब्यात असती तर हा त्रास वाचला असता. 

दुर्लक्ष केल्याची खंत
प्रथमदर्शी आपत्कालीन सेवा संस्थेतर्फे कोवाड विभागात 20 जणांचे रेस्क्‍यू फोर्स सज्ज असल्याचे पत्र 5 ऑगस्टला तहसीलदारांना दिले होते. मानधन, भत्त्याची अपेक्षा न करता समाजकार्यासाठी झटणाऱ्या तरुणांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याची खंत आहे. 
- प्रवीण गणाचारी, टीम लीडर 

ऑपरेशन असेल त्याच वेळी उपयोग
ही बोट रेस्क्‍यू ऑपरेशनसाठी आहे. खरोखरच ऑपरेशन असेल त्याच वेळी तिचा उपयोग करायचा आहे. रेस्क्‍यू जवानांच्या ताब्यात देता येत नाही. ऑपरेशन राबवताना शासनाच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत ती वापरायची आहे. 
- विजया पांगारकर, प्रांताधिकारी, गडहिंग्लज

संंपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com