जयंती नाल्याचे पाणी आता ओसंडणार नाही

 The water of Jayanti Nala will not flow anymore
The water of Jayanti Nala will not flow anymore

कोल्हापूर ः जयंती नाला यापुढे ओसंडणार (ओव्हरफ्लो) होणार नाही, अशी यंत्रणा येथे कार्यान्वित झाली आहे. डिसेंबरमध्ये नाला वाहिल्याचा कटू अनुभव डोळ्यासमोर असल्याने तिसरा पंप तातडीने कार्यान्वित झाला. सध्या साडेचारशे अश्‍वशक्तीचे (एच. पी.) प्रत्येकी तीन अशा 1300 एच. पी. इतक्‍या क्षमतेच्या पंपाद्वारे सांडपाण्याचा उपसा होत आहे. पावसाळा वगळता नाल्यातील सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळणार नाही, असा दावा महापालिकेच्या ड्रेनेज व पाणीपुरवठा विभागाने केला आहे. 
जयंती नाला आणि पंचगंगा नदीचे प्रदूषण हे अनेक वर्षांपासून समीकरण बनले होते. कसबा बावडा रोडवरून जात असताना मैलायुक्त सांडपाणी नदीच्या दिशेने जाताना पाहिले की कोणाच्याही अंगावर काटा उभा राहत होता. प्रदूषणाचे शुक्‍लकाष्ठ कधी एकदा पाठ सोडते, असा प्रश्‍न पडायचा. डिसेंबरमध्ये सलग आठवडाभर जयंती नाला ओसंडून वाहिला. महापालिकेला प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नेहमीप्रमाणे नोटीस आली. वारंवार पंप का बंद पडतात, याच्या मुळाशी जाण्याचा निर्णय ड्रेनेज व पाणीपुरवठा विभागाने घेतला. त्यानुसार सांडपाणी उपसा करणाऱ्या पंपाची क्षमता कमी असल्याचे ध्यानात आले. 
सकाळी सात ते दुपारी अकरा यावेळेत जयंती नाल्यात सांडपाणी येण्याचे प्रमाण अधिक आहे. तासाला अकरा एमएलडी सांडपाणी शहराच्या चार झोनमधून जमा होते. दुपारी चार ते सहा यावेळेत सांडपाणी मोठ्या प्रमाणावर येते. दिवसभरात एकट्या जयंती नाल्यात 50 ते 60 एमएलडी (दशलक्ष लिटर) इतके सांडपाणी जमा होते. तेथून कसबा बावडा येथील 76 एमएलडी एसटीपीकडे सांडपाणी प्रक्रियेसाठी जाते. बापट कॅम्प एसटीपी साडेअकरा एमएलडी तर लाईन बाजार एसटीपी सात एमएलडी इतक्‍या क्षमतेचा आहे. दुधाळी एसटीपीलगत सहा एमएलडीच्या एसटीपीचे अमृत योजनेतून सध्या काम सुरू आहे. 
जयंती नाल्यातून सर्वाधिक सांडपाणी बावडा एसटीपीकडे जाते. पंप थोडा जरी नादुरुस्त झाला, तर धबधब्याप्रमाणे सांडपाणी नदीत मिसळते. नदी प्रदूषणाचा प्रश्‍न सर्वच स्तरावर गांभीर्याने घेतला जात असल्याने येथील पंपाची यंत्रणा बदलण्याचा निर्णय झाला. सध्या 450 एच.पी.चे तीन पंप रात्र अन्‌ दिवस सुरू असतात. 

--

जयंती नाल्यावर तिसरा पंप कार्यान्वित झाला आहे. पूर्वी दोन पंपाद्वारे उपसा करण्यास मर्यादा होत्या. पात्रालगत सांडपाणी साचून पात्र ओलांडणार नाही यासाठी तिसऱ्या पंपाचा पर्याय पुढे आला. अन्य दोन पंप कायस्वरूपी स्टॅन्ड बाय असतील. एखाद्या पंपात बिघाड झाला तरी तास ते दोन तासात पर्यायी पंप तेथे बसविला जाईल. 
- रामदास गायकवाड, उपजल अभियंता (यांत्रिकी) 

संपादन यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com