...जेव्हा 108 रुग्णवाहिका चालकाचा श्‍वास कोंडतो

अशोक तोरस्कर
सोमवार, 25 मे 2020

दुपारी एकची वेळ. सायरन वाजवत 108 रुग्णवाहिका उत्तूर आरोग्य केंद्राच्या आवारात दाखल झाली. सुरवातीला कोणीतरी गंभीर अवस्थेतील रुग्ण आणला असेल म्हणून कर्मचाऱ्यांच्या हालचाली सुरू झाल्या; मात्र रुग्णवाहिकेत कोणीच रुग्ण नव्हता.

उत्तूर : दुपारी एकची वेळ. सायरन वाजवत 108 रुग्णवाहिका उत्तूर आरोग्य केंद्राच्या आवारात दाखल झाली. सुरवातीला कोणीतरी गंभीर अवस्थेतील रुग्ण आणला असेल म्हणून कर्मचाऱ्यांच्या हालचाली सुरू झाल्या; मात्र रुग्णवाहिकेत कोणीच रुग्ण नव्हता. पीपीई किटमध्ये श्‍वास कोंडल्यामुळे चालकच रुग्णवाहिका घेऊन आला होता.

त्यांना येथे पीपीई किट काढण्याचा सल्ला देण्यात आला. पिण्यासाठी ओआरएस दिले. थोड्या वेळाने बरे वाटल्यावर ते पुढील कामासाठी निघून गेले. कोरोनाच्या लढाईत आरोग्य कर्मचाऱ्यांचे काय हाल होतात, हे यानिमित्ताने पाहायला मिळाले. 

संदीप कुरळे हे गडहिंग्लज येथील 108 रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करतात. सकाळी त्यांना आरळगुंडी (ता. भुदरगड) येथे जाण्यासाठी कॉल आला. गावात तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यांना गारगोटी येथे पोहचविण्याची जबाबदारी कुरळे यांच्यावर सोपवण्यात आली. दक्षता म्हणून कुरळे यांनी पीपीई किट घातले व आरळगुंडी ते गारगोटी अशा तीन फेऱ्या मारल्या.

रुग्णांना पोहचवून ते गडहिंग्लजला चालले होते. पालीच्या घाटात आल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. ते घामाघूम झाले. आहे त्या स्थितीत ते 20 कि.मी. गाडी चालवत उत्तूरला पोचले. या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांना पीपीई किट उतरविण्याचा सल्ला दिला. त्यांना पिण्यासाठी ओआरएस दिले. थोड्या वेळाने त्यांना बरे वाटले. कोरोनाच्या लढाईत आरोग्य कर्मचाऱ्यांचे काय हाल होतात, हे या निमित्ताने पाहायला मिळाले. 

अर्धा तास विश्रांती घेतल्यावर पुन्हा कामावर
संदीप कुरळे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने सकाळी ते आरोग्य केंद्रात आले. त्यांचे पीपीई किट व मास्क काढले. अर्धा तास विश्रांती घेतल्यावर पुन्हा ते कामावर रुजू झाले. 
- डॉ. समीर तौकरी, वैद्यकीय अधिकारी, उत्तूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ... When 108 Ambulance Driver Feel Unhealthy Kolhapur Marathi news