
करवीर माहात्म्यमधील संदर्भ पाहता फलगू नदीचे पात्र याच पुलाजवळ जयंती नदीस मिळते व संगम होतो. या संगमावर फलगुलेश्वर मंदिर आहे.
कोल्हापूर : तटबंदीच्या आत असलेलं शहर छत्रपती शाहू व छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकीर्दीत विस्तारत गेले. शाहूपुरी व्यापार पेठ वसवली गेली. एका अर्थाने जयंती नाला हा शहराची विभागणी करतो. त्या दोन भागांना केवळ पुलाने जोडल्याने बदलाला वेग आला. पूल बांधण्याची आज फारशी अपूर्वाई वाटत नसली, तरी त्या काळात मात्र ती महत्त्वाची बाब होती. म्हणूनच तो महत्त्वाचा वारसा ठरला आहे.
छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकीर्दीत शाहूपुरी या नव्या व्यापारी वसाहतीला जोडणारा जयंती नाल्यावरील पूल बांधून अवजड वाहनांना, वाहतुकीला नवा मार्ग सुरू करून दिला. यामुळे शहराचा विस्तार होण्यास सुरुवात झाली.फेरिस मार्केट (सध्याचे शिवाजी मार्केट)पासून सुरू झालेला हा रस्ता रविवार गेट (बिंदू चौक) ते शाहूपुरी हा सात फर्लांग लांबीचा आणि ३७ फूट रुंदीचा पक्का रस्ता बनविण्यात आला. तो २५ फूट रुंदीच्या तीन कमानींचा पूल जयंती नाल्यावर बांधून त्यास जोडण्यात आला. योग्य आणि पायासाठी सुरक्षित जागा मिळावी म्हणून नाल्याची लांबी सरळ करण्यात आली.
पुराच्या काळात पाण्याची फूग तीन फुटांपर्यंत येते ही बाब लक्षात घेऊन याआधीच्या स्टेशन रोडवरील पुलापेक्षा उंची अधिक ठेवण्यात आली. पुलाच्या दोन्ही परापेट्समधील अंतर ४० फूट असून ३० फूट रुंद प्रत्यक्ष रस्ता आणि दोन्ही बाजूला फूटपाथ बांधण्यात आले. या बांधकामासाठी ७० हजार रुपये खर्च आला. नाला वळवण्यासाठी १९ हजार आणि दोन्हीकडील रस्ते करण्यासाठी ११ हजार रुपये खर्च झाले. ३ नोव्हेंबर १९२६ रोजी हे काम सुरू करून १२ एप्रिल १९२७ रोजी पूर्ण केले गेले.
हेही वाचा- दुचाकी दुरुस्तीतीतून करीअरची इंजिन मजबूत: कोल्हापूरच्या शिवानीचे आत्मनिर्भतेकडे एक पाऊल -
वाहतुकीसाठी या पुलाचे उद्घाटन मुंबई गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांच्या हस्ते १३ एप्रिल १९२७ रोजी करण्यात आले. आजही भक्कम स्वरूपात हे बांधकाम असून त्याचे स्थापत्य सौंदर्य उत्कृष्ट आहे. त्या काळातील बिडाचे रेलिंग आजही कायम आहेत. करवीर माहात्म्यमधील संदर्भ पाहता फलगू नदीचे पात्र याच पुलाजवळ जयंती नदीस मिळते व संगम होतो. या संगमावर फलगुलेश्वर मंदिर आहे. नाल्याच्या प्रवाहाच्या दिशेने पुढे छत्रपती संभाजी पूल झाल्यानंतर डाव्या बाजूला खाराळा परिसरात एका बंगल्याच्या आवारात माती सरळ करताना भाजीव विटांचे बांधलेले एक चैत्य असलेले बांधकाम सापडले होते. त्यामध्ये दगडाच्या टोपण असलेल्या पेटीत स्फटिकाचा पारदर्शक करंडा आढळला. पेटी काढताना तो करंडा फुटून त्यामध्ये असलेल्या बाबी सांडल्या.
पेटीच्या झाकणाच्या आतील बाजूस ब्राम्ही लिपीतील अक्षरे कोरलेली आढळली. त्यावरून त्याचा काळ इसवी सनाच्या पहिल्या शतकातील असावा. हे बुद्धकालीन अवशेष सध्या मुंबईतील संग्रहालयात ठेवले आहेत. त्यावर अधिक अभ्यास होण्याची गरज आहे. काळाच्या ओघात अनेक वास्तूंचे महत्त्व कमी होत गेले असले तरी त्या वास्तू आजूबाजूचे अनेक संदर्भ टिकवून ठेवू शकतात. त्यासाठी तरी त्यांचे वारसास्थळ म्हणून जतन केले पाहिजे.
संपादन- अर्चना बनगे