नृसिंहवाडीत चैत्र पौर्णिमा भाविकांविनाच 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 April 2020

चैत्र पौर्णिमा आज भाविकांविना साजरी झाली. मोजक्‍याच सेवेकऱ्यांना घेऊन मुख्य मंदिरात पूजा, धार्मिक सेवा रात्री उशिरापर्यंत सुरू होती. चैत्र पौर्णिमेला एरवी सुमारे 50 हजार भाविकांची उपस्थिती असते. मात्र, "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर दत्त मंदिर दर्शन सेवा 17 मार्चपासून बंद आहे. 

नृसिंहवाडी : येथील चैत्र पौर्णिमा आज भाविकांविना साजरी झाली. मोजक्‍याच सेवेकऱ्यांना घेऊन मुख्य मंदिरात पूजा, धार्मिक सेवा रात्री उशिरापर्यंत सुरू होती. चैत्र पौर्णिमेला एरवी सुमारे 50 हजार भाविकांची उपस्थिती असते. मात्र, "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर दत्त मंदिर दर्शन सेवा 17 मार्चपासून बंद आहे. 

गेल्या 20 दिवसांपासून दत्त मंदिर बंद आहे. गुढीपाडवा, रामनवमी हे महत्वाचे सण, उत्सवही भाविकांविना झाले. त्याचाच प्रत्यय आजही आला. दत्त मंदिर परिसरात आज सकाळी साडेसहाला हनुमान जन्मकाळ सोहळा झाला. शेकडो भाविक व सेवेकरी यांच्यामार्फत होणारी हनुमान जयंती आज फक्त तीन सेवेकऱ्यांच्या मार्फत झाली. 
दत्त जयंतीनंतर म्हणजे मार्गशीर्षनंतरची पाचवी पौर्णिमा म्हणून हनुमान जयंतीच्या निमित्ताने आलेल्या चैत्र पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. मंदिरात दर्शनासाठी रांगा नव्हत्या. ना मिठाई घेण्यासाठी लगबग होती. आज दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम सेवेकऱ्यांमार्फत झाले. पहाटे पाचपासून दत्त देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव पुजारी व सचिव गोपाळ पुजारी यांनी दिवसभरात देवस्थान प्रशासनाची धुरा सांभाळली. पहाटे काकड आरती, दुपारी बाराला महापूजा, त्यानंतर रुदाभिषेक, दुपारी पवमान झाले. 

सायंकाळी पालखी, धूपारती, शेजारती झाली. दरम्यान, दत्त मंदिराच्या परिसरात सुमारे 100 कुत्र्यांचा समूह आहे. त्यांना दत्त देवस्थान ट्रस्ट व सेवेकऱ्यांमार्फत रोज खाद्यपदार्थ देऊन भूतदया जोपासली जात आहे. 

पक्ष्यांचा किलबिलाट... 
एरवी मंदिर परिसरात भाविकांची गर्दी व्हायची. आज परिसरात पक्ष्यांचा किलबिलाट पहाटेपासून जाणवला. चिमण्या, कावळे, कोकिळा यांचे मंजूळ धून कानावर वाऱ्याच्या सान्निध्यात पडत होते. अनेक पक्षी थेट नदीच्या पात्रात जाऊन पाणी पिताना पाहावयास मिळत असल्याची माहिती सेवेकरी विवेक पुजारी यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Without the devotees of Chaitra Purnima in Narsinghwadi