सव्वाशे वर्षांपुर्वीच्या जागतिक मल्लयुद्धांचा साक्षीदार... 

Witnessing the World Wrestling Wars
Witnessing the World Wrestling Wars

बाबूजमाल तालीम ही सध्याच्या पिढीला हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे प्रतीक म्हणून माहिती आहे. इथला गणेशोत्सव आणि मोहरम दोन्ही सण तितक्‍याच भव्यतेने साजरे होतात. तालमीच्या लाल आखाड्यात आजही नामांकित पैलवान घडताहेत आणि त्याचवेळी छत्रपती शिवाजी हॉलमध्ये घडणारे ज्यूदो खेळाडू केवळ देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर कोल्हापूरचा लौकिक वाढवत आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आज ज्या ठिकाणी कत्तलरात्रीचा धार्मिक विधी होतो, त्या ठिकाणी सव्वाशे वर्षांपूर्वी जागतिक मल्लयुद्धे व्हायची आणि त्याचे पुरावे आजही उपलब्ध आहेत. 

बाबूजमाल दर्गा हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे प्रतीक. दर्ग्यात प्रवेश करताना सर्वांत पहिल्यांदा चौकटीवर कोरलेल्या श्री गणेशाचे दर्शन येथे घ्यावे लागते. तालमीची स्थापना नेमकी कधी झाली, याचा नेमका उल्लेख मिळत नसला तरी 1840 पूर्वीची ही तालीम आहे. कारण छत्रपती तिसरे शिवाजी महाराज यांच्या काळात या तालमीचे अनेक ठिकाणी उल्लेख आढळतात. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा जाज्वल्य इतिहासही या तालमीला आहे. क्रांतिकारक चिमासाहेब आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या शिवाजी क्‍लबच्या अनेक बैठका किंबहुना बहुतांश काम तालमीतूनच चालायचे. गणेश वडणगेकर, बाबूराव महाडिक, ज्ञानदेव भोसले ही मंडळी त्यात आघाडीवर होती; तर शहराचे पहिले महापौर बाबासाहेब कसबेकर आणि नगराध्यक्ष एन. डी. जाधव याच तालमीच्या परिसरातले. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी तालमीला नेहमीच बळ दिले. त्यांनीच 19 फेब्रुवारी 1913 ला काढलेल्या एका हुकमात त्याचे उल्लेख आहेत. 

कुस्तीत या तालमीचा दबदबा पहिल्यापासूनच कायम राहिला. वस्ताद रावजी सांगावकर, गोपाळ जाधव, तुकाराम कसबेकर, धोंडी कसबेकर, पठाण वस्ताद, गोविंद कसबेकर, रामा रायबाग, शामा रायबागे, बाबालाल डिग्गेवाडी, मीरासाहेब मुजावर, धोंडिराम जमादार, गुंगा पाटील, महादेव जामदार, यशवंत कसबेकर, बाबू टांगेवाला, बाबासाहेब मुजावर, विश्‍वास शिंदे, इलाई मुजावर, शौकत सय्यद आदी तत्कालीन प्रसिद्ध मल्लांची ही यादी फार मोठी आहे. तालमीतील विविध सण-उत्सवांतील धार्मिक विधींची जबाबदारी जयवंतराव कसबेकर आणि सय्यद बंधू यांच्याकडे असून, तालमीचे अध्यक्ष अमित चव्हाण आहेत. मानसिंग शिंदे (उपाध्यक्ष), अनिल पाटील (खजानीस), अभय नाचणकर (सचिव) आदींच्या मार्गदर्शनाखाली नवी पिढी आता कार्यरत झाली आहे. महापूर असो किंवा कोरोना, प्रत्येक आपत्तीच्या काळात तालमीने नेहमीच दातृत्वाचा हात पुढे केला आहे. 

खासबागपूर्वी बाबूजमाल..! 
खासबाग मैदानाची निर्मिती होण्यापूर्वी बाबूजमाल तालीम परिसरात कुस्त्यांचे जंगी फड रंगायचे. 1 फेब्रुवारी 1891 ला प्रसिद्ध झालेली एक जाहिरात त्याची साक्ष देते. पैलवान नारायण कसबेकर आणि पुण्याचा प्रसिद्ध मल्ल बाबूमियॉं यांच्यात झालेल्या कुस्तीची ही जाहिरात आहे. या कुस्तीत विजयी मल्लाला 450 रुपये, तर पराभूत मल्लाला 100 रुपयांचे बक्षीस होते. बाबूजमाल तालमीत पाकिस्तानचे प्रसिद्ध मल्ल गुंगा पैलवान, कल्लू गामा, सादिक पैलवान, मेहराज, रियाज बिल्ला, लाला जमाल आदी मल्ल सराव करीत होते. 

बाबूजमाल तालमीला मोठी परंपरा आहे आणि नवी पिढीही तितक्‍याच नेटाने ती पुढे नेते आहे. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली परंपरा जपतानाच विविध समाजोपयोगी उपक्रमात तालमीचा सक्रिय सहभाग राहिला आहे. 
- अमित चव्हाण, अध्यक्ष, बाबूजमाल तालीम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com