काशीविश्वेश्वरांना दर्शन रूपात अंबाबाईची पूजा; खास विमानाने तिरुपती देवस्थानकडून महावस्त्र अर्पण

संभाजी गंडमाळे
Thursday, 22 October 2020

तिरुपती देवस्थान ट्रस्टकडून आज देवीला महावस्त्र अर्पण करण्यात आले

कोल्हापूर : नवरात्रोत्सवाच्या सहाव्या दिवशी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची काशीविश्वेश्वरांना दर्शन या रूपातील सालंकृत पूजा बांधण्यात आली. करवीर क्षेत्रात असलेले दशाश्वमेध तीर्थ व त्याचे महत्त्व श्रीशिव पार्वतीला सांगतात व उमेसह करवीर क्षेत्री राहण्यासाठी क्षेत्रदेवतेची म्हणजेच श्री अंबाबाईची स्तुती करून परवानगी मागतात. त्यावेळी श्री अंबाबाई श्रीशिवाला तिच्या उजव्या हाताच्या दिशेला वास करण्यास व येथील प्रत्येक जीवास अंती तारकमंत्राचा उपदेश करण्यास सांगते. तो ईशान सध्या अंबाबाई मंदिराच्या उजव्या बाजूचा काशीविश्वेश्वर. त्याच्यासमोर काशी कुंडही आहे. त्यामुळे करवीरला काशीचा दर्जा आहे, असे या पूजेचे महात्म्य असल्याचे श्रीपूजक मकरंद मुनीश्वर, माधव मुनीश्वर यांनी सांगितले. 

दरम्यान, तिरुपती देवस्थान ट्रस्टकडून आज देवीला महावस्त्र अर्पण करण्यात आले. ट्रस्टचे पदाधिकारी खास विमानाने हे महावस्त्र घेऊन येथे आज दुपारी साडेबाराच्या सुमारास आले. मंदिरात देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्याकडे ते सुपूर्द करण्यात आले. यावेळी तिरुपती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त, आमदार भास्कर रेड्डी, सुवर्णलता रेड्डी, प्रशांति रेड्डी, गोपीनाथ जेट्टी, धर्मा रेड्डी, रमेश रेड्डी आदी उपस्थित होते. एक लाख पाच हजार सहाशे रुपये या महावस्त्राचे मूल्य असल्याचे ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

हे पण वाचादख्खनचा राजा श्री जोतिबा  देवाचा उद्या होणार जागर ; पाच पाकळी सोहन कमळ पुष्पातील महापूजा  

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Worship of Ambabai as a darshan to Kashi Vishweshwar