तालमीतील मल्लांनी थोपटले दंड ः महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी खुल्या गटासाठी कसून सराव

 Wrestlers slap fines in training:
Wrestlers slap fines in training:

कोल्हापूर : यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले नसले तरी शहरातील तालमीतील मल्लांनी मात्र दंड थोपटले आहेत. खुल्या गटात उतरण्यासाठी त्यांचा कसून सराव सुरू आहे. महाराष्ट्र केसरीची गदा कोल्हापूरला कधी मिळणार, या विषयाला पूर्णविराम देण्याकरिता न्यू मोतीबाग तालमीतील पैलवान शंकर चौगले व अजित पाटील यांची जोरदार तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंग यांच्या राष्ट्रकुल आखाड्यातील तीन पैलवानांनी महाराष्ट्र केसरीसाठी शड्डू ठोकला आहे. 

कोरोनाच्या संचारबंदीने पैलवानांच्या सरावाला ब्रेक मिळाला. तालमी बंद राहिल्याने सहा महिन्यांहून अधिक काळ पैलवानांच्या लढतींवर मर्यादा आली. काही पैलवानांनी मात्र घरीच जोर-बैठका मारत व्यायामात सातत्य ठेवले. डिसेंबर उजाडल्यानंतर कुस्ती क्षेत्रात महाराष्ट्र केसरीच्या अधिवेशनाबाबत विचारणा सुरु झाली. नव्या वर्षात पुण्यात अधिवेशन घेण्याच्या हालचाली आहेत. त्याबाबतचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. त्याची फारशी फिकीर न करता तालमीतील पैलवानांनी सराव सुरू ठेवला आहे. 
श्री शाहू विजयी गंगावेश तालीम तालमीतील माऊली जमदाडे, सिकंदर शेख, दत्ता नरळे व प्रकाश बनकर सोलापूर, वैभव रासकर सांगली व ऋषभ आवारे पुणे जिल्ह्याकडून खुल्या गटात खेळण्याच्या तयारीत आहेत. शाहूपुरी तालमीतील उपमहाराष्ट्र केसरी संतोष दोरवड व हसन पटेल सोलापूर जिल्ह्याकडून खेळणार आहेत. संतोष टेंबूर्णी तर हसन असेगावचा आहे. राहुल सरक सातारा जिल्ह्यातील मिरगावचा असल्याने तो सातारा जिल्ह्याकडूनच मैदानात शड्डू ठोकेल. गतवर्षीच्या मैदानात चर्चेचा ठरलेला बाला रफिक शेख सध्या दांगट तालमीत सराव करत आहे. तो बुलढाणा जिल्ह्याकडून खेळणार आहे. न्यू मोतीबाग तालमीतील विकास पाटील सांगली तर सुकुमार जाधव सातारा जिल्ह्याकडून नशीब आजमावणार आहेत. कोल्हापूरचा अजित पाटील व शंकर चौगले कोल्हापूर जिल्ह्याला मानाची गदा मिळविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार आहेत. मोतीबाग तालमीतील संग्राम पाटील, समीर देसाई, संतोष लवटे व शुभम सिदनाळे गेल्यावर्षी खुल्या गटात होते. सध्या खुल्या गटासाठी दावेदार म्हणून या चौघांपैकी कोणाची तयारी सुरू आहे, हे सांगणे कठीण असल्याचे तालमीच्या सूत्रांचे म्हणणे आहे. 

राष्ट्रकुलमध्ये तिघांची तयारी 
राष्ट्रकुल आखाड्यातील अक्षय मंगवडे कुमार महाराष्ट्र केसरी विजेता आहे. तो सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते राम सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली तो पंधरा वर्षे सराव करतो. सुनील पहिल्यांदाच माती विभागातून खुल्या गटात उतरणार आहे. विकास पाटील बत्तीसशिराळाचा असून, अनेक वेळा प्रथम क्रमांकाच्या लढती लावण्यात आल्या आहेत. हे तिघेही यंदा खुल्या गटातून लढणार आहेत.

संपादन - यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com