शाहु कालीन तालमीचा कुस्ती अन्‌ मर्दानी खेळात लौकीक 

Wrestling of Shahu Kalin Talim
Wrestling of Shahu Kalin Talim

बजाप माने हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व. मर्दानी खेळात त्यांचा लौकिक तसेच वस्ताद म्हणूनही त्यांची शहरात ओळख होती. भांडण-तंटे सोडविण्यासाठी लोक त्यांच्याकडेच येत. तालमीला त्यांनी स्वत:ची जागा दिली. कौलारू, दगडी बांधकाम असलेली इमारत तत्कालीन कार्यकर्त्यांनी उभारली. ही तालीम त्यांच्या नावाने आजही आपली ओळख जोपासत आहे. राजर्षी छत्रपती शाहू कालीन ही तालीम. के. ब. जगदाळे यांनी नगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी दोन मजली इमारत उभी केली. 

राजर्षी शाहू महाराज यांच्या काळात ज्या तालमी स्थापन झाल्या त्यात बजापराव माने तालमीचा उल्लेख आवर्जुन येतो. धोंडीराम भोसले, बाबूराव चिले, महिपत शिंदे, सर्जेराव शिंदे, सुखदेव भोसले, रामभाऊ वाकरेकर, जयसिंग वाकरेकर, बापू साळोखे, रंगराव जाधव, नारायण माने या तालमीचे नावाजलेले पैलवान. शंकरराव जाधव, गणपत परदेशी, आनंद चौगले या वस्तादांनी परिसरातील अनेकांना कुस्तीत घडवण्याचे काम केले. नाथा चौगुले, आप्पा पोवार, सुभाष मोहिते यांनी चमकदार कुस्त्या करत तालमीचा लौकिक कायम ठेवला. वसंतराव कोतमिरे, शामराव परदेशी, आनंद पाटील यांनी मर्दानी खेळात, तर रामभाऊ कारंडे, दत्तोबा कांबळे, गोविंद वाकरेकर, रंगराव कारंडे यांनी आट्या-पाट्या खेळात चमकदार कामगिरी केली. फुटबॉलमध्ये अनेक खेळाडूंनी आपला ठसा उमटवला. सहकार क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करण्यात तालमीचे कार्यकर्ते मागे पडले नाहीत. 

के. ब. जगदाळे, एम. के. जाधव यांनी नगराध्यक्षपद भूषवले. त्याचबरोबर सर्व हयात सामाजिक चळवळीत घालवली. दत्तोबा चव्हाण मुलुख मैदान तोफ म्हणून प्रसिद्ध होते. सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात तालमीच्या परिसरातील चेहरे चमकले. अलका इनामदार, दिनकर इनामदार, राजाराम जाधव, शाम कांबळे यांनी चित्रपटसृष्टीत स्वत:चे नाव केले. बळवंत सावंत, राजाराम चव्हाण यांनी नाट्यसृष्टीत स्वत:ची छाप पाडली. कंचनी शा-बाबला (कांचन माळी) यांनी पार्श्‍वगायनाने परदेशातही प्रसिद्धी मिळवली. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचे वैज्ञानिक सल्लागार ज्येष्ठ शास्त्रज्ञ वसंतराव गोवारीकर यांचे पंचेचाळीस वर्षांपूर्वी तालमीच्या परिसरात वास्तव्य होते. 

"जुनं ते सोनं,' याचा अभिमान बाळगत तालमीने विविध उपक्रम आजही सुरू ठेवले आहेत. शिवजयंती, राजर्षी छत्रपती शाहू महाराज व विवेकानंद जयंतीसह स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन येथे साजरे केले जातात. त्यानिमित्त रांगोळी, चित्रकला, हस्ताक्षर स्पर्धाही घेतल्या जातात. त्र्यंबोली यात्रा, हनुमान जयंती, गणेशोत्सवही थाटामाटात साजरा केला जातो. सजीव देखाव्यांतून सामाजिक प्रबोधनाचे विषय हाताळले जातात. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत आर्थिक मदतीचा हातही आपत्तीच्या काळात दिला जातो.

आंध्रचे वादळ, किल्लारीचा भूकंप, कारगील युद्धावेळी संस्थेने आर्थिक मदत दिली आहे. तालमीत अद्ययावत व्यायामशाळा साकारली असून, युवा पिढी बलवान व्हावी, या त्यामागचा उद्देश आहे. तालमीची शंभर वर्षांपूर्वीची जुनी इमारत रस्ता रूंदीकरणासाठी महापालिकेने 2001 मध्ये पाडली. त्यानंतर आमदार फंडातून कमी जागेत अतिशय चांगली इमारत बांधली आहे. सध्या अध्यक्ष म्हणून शिवाजीराव ढवाण, उपाध्यक्ष रावजी कुराडे, तर सचिव म्हणून चंद्रमोहन पिसाळ काम पाहत आहेत. 

बजापराव माने तालमीच्या शंभर वर्षांच्या वाटचालीत तळमळीच्या कार्यकर्त्यांसह समाजातील दानशूर व्यक्‍तींचे मोलाचे साह्य लाभले आहे. म्हणूनच एका छोट्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झालेले आज पाहायला मिळत आहे. 
- शिवाजीराव ढवाण, अध्यक्ष, बजापराव माने तालीम 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com